नाशिक : शहरातील बहुचर्चित स्वघोषित कॅप्टन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मांत्रिक अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यात नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट- १ च्या पथकाने अटक केली आहे.
सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीकडून एक पेनड्राइव्ह जप्त केला असून, त्यामध्ये तब्बल ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या व्हिडिओमध्ये काही नामांकित महिला, सेलिब्रिटी, वरिष्ठ अधिकारी तसेच राजकीय क्षेत्राशी संबंधित महिला आहेत. या सर्व व्हिडिओंची पोलिसांकडून सखोल तपासणी सुरू असून, या प्रकरणातून आणखी गंभीर बाबी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात अशोक खरात याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिलेने दिलेल्या तक्रारीत आरोपीने स्वतःला आध्यात्मिक मार्गदर्शक आणि मांत्रिक म्हणून ओळख निर्माण केली होती. विविध अडचणी दूर करण्याचे तसेच जीवनातील समस्या सोडविण्याचे आश्वासन देत त्याने अनेक महिलांशी संपर्क साधला होता. फिर्यादी महिलेलाही त्याने अशाच प्रकारे विश्वासात घेतल्याचा आरोप आहे.
महिलेच्या तक्रारीनुसार आरोपीने महिलेला धमकी देत तसेच गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे नमूद करण्यात आले आहे. या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर नाशिक क्राईम ब्रांच युनिट-१ च्या पथकाने बुधवारी (दि. १८) पहाटे सुमारे ३ च्या सुमारास अशोक खरात याला ताब्यात घेत अटक केली. त्यानंतर त्याच्या ठिकाणी छापा टाकून तपास करताना पेनड्राईव्हसह काही इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आले. या पेनड्राईव्हमध्ये ५८ व्हिडिओ आढळून आले असून, त्यातील मजकूर आणि संबंधित व्यक्तींची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
आध्यात्मिक मार्गदर्शकाची प्रतिमा
या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. अशोक खरात हा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असल्याची माहिती आहे. तो अंकशास्त्र व आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण करत होता. विविध क्षेत्रांतील अनेक व्यक्ती त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी येत असल्याचे सांगितले जाते.
अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधील सेवानिवृत्त अधिकारी असल्याचीही माहिती पुढे आली आहे. मर्चंट नेव्हीमध्ये त्याने सुमारे २२ वर्षे सेवा बजावली असून, त्या काळात १५४ देशांचा प्रवास केल्याचा दावा त्याने केला होता. विविध देशांतील धार्मिक परंपरा, संस्कृती आणि आध्यात्मिक पद्धतींचा अभ्यास केल्याचे तो सांगत असे. त्यानंतर त्याने अंकशास्त्र, कॉस्मॉलॉजी आणि आध्यात्मिक मार्गदर्शनाच्या नावाखाली कार्य सुरू केले होते.
या घटनेनंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या व्हिडिओंची तपासणी करून संबंधित सर्व बाबींचा छडा लावावा, तसेच जर इतर महिलांची फसवणूक अथवा अत्याचार झाल्याचे आढळून आले तर त्यांनीही न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास नाशिक क्राईम ब्रांच युनिट-१ कडून सुरू असून, जप्त केलेल्या डिजिटल पुराव्यांचे तांत्रिक विश्लेषण करण्यात येत आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणात आणखी गुन्हे नोंद होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पोलीस अटक करण्यासाठी कॅप्टन खरातच्या घरी गेले. त्याने अटक टाळण्यासाठी राजकीय पदाधिकारी व राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र कुठूनही प्रतिसाद मिळाला नाही.
सदर कारवाई पोलीस यंत्रणेने अत्यंत गोपनीयपणे पार पाडली. अशोक खरात याच्यावर कारवाई करण्याबाबत एक-दोन महिन्यांपासून कार्यवाही सुरू होती. यासंदर्भात राज्य स्तरावर सुद्धा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या व गृह विभागाच्या बैठका झाल्या. ज्योतिषी अशोक खरात व फिर्यादी यांच्यामध्ये यापूर्वीही वाद झाला होता. सदर वादाचे रूपांतर हे हाणामारीत सुद्धा झाले होते.
आठ दिवसांपूर्वी दुसऱ्या जिल्ह्यातील पोलीस पथकही स्वघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याच्यावर पाळत ठेवत होते. शिर्डी येथील एकाच कुटुंबातील तीन महिलांच्या लैंगिक शोषणाबाबतचे प्रकरण होते. मात्र सदर पथक फक्त पाळत ठेवून नंतर निघून गेले. अशाच प्रकारच्या मुंबई येथील जुहू भागातही याच प्रकारचे लैंगिक शोषण झाल्याची घटना उघडकीस आल्याची समजते.