म्हापसा : पुढारी वृत्तसेवा
किनारी भागात पर्यटकांना त्रास देणाऱ्या दलालांविरोधात कळंगुट पोलिसांनी कारवाई करत १४ आणि १५ ऑक्टोबर रोजी एकूण १३ जणांना अटक केली. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १२६ आणि १७० अंतर्गत ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
कळंगुट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ ऑक्टोबर रोजी सात जणांना, तर १५ ऑक्टोबर रोजी सहा जणांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कळंगुट, हडफडे, कांदोली आणि नागवा येथील रहिवाशांसह अन्य राज्यांतील व्यक्तींचाही समावेश आहे.
संबंधित कायदेशीर तरतुदीनुसार ही कारवाई करण्यात आली असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची दलालांकडून होणारी फसवणूक आणि छळवणूक रोखणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
काही बेकायदेशीर एजेंट पर्यटकांना चुकीची माहिती देऊन आकर्षित करतात किंवा त्यांना त्रास देतात.अशा प्रकारांमुळे गोव्याच्या पर्यटन क्षेत्राच्या प्रतिमेला धक्का पोहोचतो. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी ही मोहीम अधिक तीव्र केली असल्याचे सूत्र Al कडून सांगण्यात आले.
दरम्यान, या कारवाईमुळे किनारी भागात पर्यटकांना त्रास देणाऱ्या दलालांचे धाबे दणाणले असून पोलिसांनी या कारवाईत सातत्य ठेवावे, अशी मागणी नागरिकांसह पर्यटकांकडून होत आहे.