नाशिक : आसिफ सय्यद
नाशिकमध्ये २४ प्रकारचे फुलपाखरे असून, यात 'कॉमन इंडियन क्रो' या दुर्मीळ प्रजातीच्या फुलपाखराचा समावेश आहे. महापालिकेने केलेल्या पर्यावरणीय सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली. महापालिका हद्दीत २८ प्रजातींचे पक्षी असून, फुलपाखरू तसेच विविध प्रकारच्या पक्ष्यांची संख्या चांगल्या जैवविविधतेचे लक्षण असल्याचे पर्यावरण अहवालात नमूद करण्यात आले आहे.
महापालिकेच्या माध्यमातून दरवर्षी एका खासगी संस्थेमार्फत पर्यावरणीय सर्वेक्षण करून महासभेला अहवाल सादर केला जातो. स्थलांतरित पक्षी हा एक परिसंस्थेतील महत्त्वाचा भाग असल्याने प्राणी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देतात. निसर्गातील एखादी प्रजाती नष्ट झाली तर संपूर्ण परिसंस्था कोलमडते. त्यामुळे पर्यावरणीय समतोल राखणाऱ्या जीवसृष्टीचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात येते. यामध्ये फुलपाखरू आणि पक्ष्यांचा समावेश होतो. फुलपाखरे आणि पतंग निसर्गातील एक महत्त्वपूर्ण भाग आहे. फुलपाखरे आणि पतंग अत्यंत मूल्यवान असून, त्यांचे संवर्धन केले जाणे गरजेचे आहे. कारण फुलपाखरे सजीवसृष्टीचा एक भाग असून, समृध्द जैवविविधतेचे प्रतीक आहे. नाशिक शहरात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात शहर परिसरात फुलपाखरांच्या विविध २४ प्रजाती आढळल्या आहेत. पक्षी विविध परिसंस्थांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. पक्षी निर्सगातील एक अविभाज्य घटक आहे. निसर्गाची सफाई, परागकणांची वाहतूक, कीटक खाणे आदीसंख्या प्रमुख भूमिका पक्षी बजावतात. पक्ष्यांची चांगली विविधता निरोगी पर्यावरण दर्शविते. पक्षी प्रदूषणाचे सूचक म्हणून काम करतात. सर्वेक्षणात २८ प्रकारचे पक्षी आढळून आले आहेत. यामध्ये काही पक्षी पाण्याच्या स्रोतांजवळ राहणारे आहेत. मैना, कावळा, कबुतर, बुलबुल, सनबर्ड, कोतवाल, गाय, बगळे, आदी पक्ष्यांची नोंद या सर्वेक्षणादरम्यान घेण्यात आली.
नाशिक शहर परिसरात केलेल्या सर्वेक्षणात कॉमन इंडियन क्रो, ब्लू मोर्मोन, ब्लू प्यान्सी, ब्लू टायगर, कॉमन ग्रास यलो, कॉमन मोर्मोन, कॉमन लेपर्ड, रेड प्यारोट, यलो प्यान्सी, प्लेन टायगर, लाईम बटरफ्लाय, स्मॉल ग्रास यलो, स्मॉल आॉरेंज टीप, यलो प्यासी आदी २४ प्रकारच्या फुलपाखरांच्या प्रजाती आढळून आल्या आहेत. १९७२ सालच्या वन्यजीव (संरक्षण) कायद्यानुसार कॉमन क्रो वगळता इतर फुलपाखरांचा समावेश संवेदनशील प्रजातींमध्ये होत नाही. कॉमन क्रो या प्रजातीच्या फुलपाखराच्या प्रजातीची नोंद वन्यजीव कायद्यात आहे.
साधारणत: मध्यम आकाराच्या या फुलपाखरांचा रंग चकचकीत काळा असतो. पंखांच्या खालच्या बाजूस हाच रंग काहीसा तपकिरी असतो. पंखांच्या कडांना खालच्या आणि वरच्या दोन्ही बाजूस पांढऱ्या ठिपकांच्या दोन रंगांची नक्षी असते. कॉमन क्रो फुलपाखरांना भक्षक खाऊ शकत नाहीत कारण त्यांच्या अंगात विषारी द्रव्ये असतात. सुरवंट अवस्थेमध्ये असतानाच त्यांना हे विषारी द्रव्य प्राप्त होतात.
शहरी भागात हरित पट्टे, उद्यान, खेळाची मैदाने, निर्माण करणे. शहरातील हरित पट्ट्यांचे सुशोभीकरण करणे गरजेचे असून, तसे केल्यास या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचे जीवनमान उंचावेल, अशी प्रमुख शिफारस या अहवालाद्वारे करण्यात आली आहे. वृक्षलागवड केल्यानंतर संर्वधनावरही महापालिकेने लक्ष केंद्रित केले पाहिजे, असेही पर्यावरण अहवालात म्हटले आहे.