Nashik Nandurbar highway bus accident
देवळा : विंचूर-प्रकाशा ७५२ जी महामार्गावरील भावडे फाट्याजवळ आज (दि.१४) एक मोठा अपघात घडला. बस पलटी होऊन ती रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या अपघातात बसमधील ३६ प्रवाशांपैकी सहा प्रवासी जखमी झाले, तर इतरांना प्रथमोपचार देऊन सोडून देण्यात आले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. बस थोड्या अंतरावर असलेल्या दोन्ही विहिरींपासून पलटी झाली. यामुळे मोठा अनर्थ टळला.
या अपघाताबाबत अधिक माहिती अशी की, साक्री आगाराच्या नाशिक-नंदुरबार बस (एमएच२० बीएल २६६१) सटाणा कडे जात असताना, भावडे फाट्याजवळ, वेगावर नियंत्रण ठेवताना पलटी झाली. या मार्गावर भावडबारी घाटाच्या पुढे काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्यामुळे एकेरी वाहतूक चालू होती. तथापि, रस्त्यावर असलेल्या बॅरिकेट्सचा बस चालकाला अंदाज आला नाही. अधिक वेगामुळे बस पलटी झाली. या अपघातामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला.
तत्काळ स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी प्रवाशांना बाहेर काढले. काही जणांना किरकोळ दुखापती झाल्या, तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांमध्ये नंदा दिलीप नंदन (६२) (ताहाराबाद), उषा किशोर शिंदे (४०) (सटाणा), ऋतूजा किशोर शिंदे (१८) (सटाणा), निर्मला देविदास पाडवी (४०) (नंदुरबार), किरण सुरेश सोनार (५५) (नंदुरबार), आणि शौर्य गोविंदा सोनार (१०) (नंदुरबार) यांचा समावेश आहे.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांनी तातडीने धाव घेतली आणि परिस्थितीचे नियंत्रण केले. देवळा पोलिसांनी मोटार अपघात म्हणून गुन्हा दाखल केला आहे.
बस ज्या ठिकाणी पलटी झाली, त्याच्या अगदी जवळच दोन विहिरी होत्या एक कठड्याशिवाय आणि दुसरी बांधलेली. जर बस त्यापेक्षा अधिक पुढे गेली असती, तर मोठा अनर्थ घडला असता. या घटनेने देवळा तालुक्यातील पाच वर्षांपूर्वी झालेल्या बस विहिरीत पडण्याच्या अपघाताची आठवण ताजी केली.