नाशिक : केंद्रीय अर्थसंकल्पातून आयकर मर्यादा 12 लाखांपर्यंत वाढवून नोकरदारांना दिलासा देण्यात आला असला तरी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होऊ घातलेला सिंहस्थ कुंभमेळा, महत्त्वाकांक्षी मेट्रो निओ, नमामि गोदा, नाशिक-पुणे रेल्वे यासाठी या अर्थसंकल्पात कुठलीही तरतूद केली गेली नसल्यामुळे नाशिककरांची मात्र घोर निराशा झाली आहे.
2027 मध्ये नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. या सिंहस्थाची प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू झाली आहे. सिंहस्थानिमित्त नाशिकमध्ये येणाऱ्या साधु-महंत व भाविकांना विविध मुलभूत सेवासुविधा पुरविण्यासाठी नाशिक महापालिकेने सात हजार 767 कोटींचा आराखडा तयार केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम, वन, पर्यटन, पोलिस, आदी अन्य विभागांचा आराखडा देखील सात हजारांवर गेला असून अशाप्रकारे सर्व विभागांचा एकत्रित सिंहस्थ आराखडा 15 हजार कोटींच्या घरात गेला आहे. सिंहस्थासाठी आता जेमतेम दीड ते दोनच वर्षांचा कालावधी उरल्याने सिंहस्थांतर्गत हाती घ्यावयाच्या रस्ते, रिंगरोड, उड्डाणपुल, इमारत बांधणी आदी कामांसाठी तसेच या कामांच्या भूसंपादनाच्या प्रक्रियेला आतापासूनच सुरुवात होणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात भरिव तरतूद केली जाईल, अशी अपेक्षा नाशिककरांकडून व्यक्त केली जात होती. मात्र, सिंहस्थासाठी या अर्थसंकल्पातून कुठलीही तरतूद केली गेलेली नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2017 मध्ये नाशिकमध्ये टायरबेस मेट्रो निओ प्रकल्प राबविण्याची घोषणा केली होती. यासाठी 2021 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद देखील करण्यात आली. मात्र, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेअभावी हा प्रकल्प रखडला. आता पुन्हा एकदा केंद्र व राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर नाशिकच्या मेट्रो निओ प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु हा प्रकल्प पुन्हा एकदा दुर्लक्षित राहिला आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरीसह उपनद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी 'नमामि गोदा' प्रकल्प राबविण्याची घोषणा महापालिकेतील भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी केली होती. गेल्या तीन वर्षांत या प्रकल्पाला कुठलीही गती मिळू शकली नाही. निदान यंदा तरी या प्रकल्पासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद केली जाण्याची अपेक्षा होती, मात्र तीही फोल ठरली आहे. नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठीही अर्थसंकल्पात तरतूद दिसत नसल्यामुळे नाशिककरांची निराशा झाली आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासह नाशिकच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद नसने दुर्दैवी आहे. विकसित भारतची घोषणा झाल्यानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प असल्याने आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेतकरी आणि माध्यमवर्गीय यांच्यासाठी शाश्वत आणि सकारात्मक बाबी असणे अपेक्षित होते. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून लोकप्रित घोषणांचा भास निर्माण केला गेलाय. मात्र, शेतकऱ्याची उत्पन्न वाढ, मध्यमवर्गाची महागाईपासून मुक्ती याबाबत कोणतेही ठोस असे काहीही आल्याचे दिसत नाही.राजाभाऊ वाजे, खासदार, नाशिक.