नाशिक : ज्या चुका भूतकाळात झाल्या त्या भविष्यात होणार नाहीत. बहुजन समाज पक्षामध्ये कार्यकर्त्यांच्या भावनांना स्थान दिले जाईल. आयत्या वेळी आलेल्या उमेदवारांना तिकीट दिले जाणार नाही. स्थानिक कार्यकर्ते ज्यांचे नाव पुढे करतील, त्यांनाच तिकीट दिले जाईल, अशी ग्वाही बहुजन समाज पक्षाचे माजी खासदार तथा महाराष्ट्र प्रभारी डॉ. अशोक सिद्धार्थ (BSP MP Ashok Siddharth) यांनी दिली. बहुजन समाज पक्षाची महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठक व प्रशिक्षण शिबिर रोटरी क्लब हॉलमध्ये पार पडले. यावेळी ते बोलत होते.
डॉ. सिद्धार्थ म्हणाले, कार्यकर्त्यांशी त्वरित संपर्क हेच राजकीय यशाचे खरे सूत्र आहे. कार्यकर्ते सांगतील, त्यालाच येत्या विधानसभेत तिकीट दिले जाईल. ज्यांना पक्षातून बाहेर काढले आहे, त्यांना पुन्हा स्थान नाही. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात कार्यकर्त्यांची फळी मजबूत करणे हेच ध्येय असायला हवे. 1838 ते 1950 या 102 वर्षांच्या संघर्षाची देण संविधान आहे. या 102 वर्षांत तीन प्रखर आंदोलने झाली. पहिल्या आंदोलनात पीडित, शोषित समाज अन्यायाविरोधात उभा राहिला. दुसर्या आंदोलनात आरक्षणाची लढाई लढली गेली, तर तिसर्या आंदोलनात बहुजन समाजाने क्रांती केल्याचे ते म्हणाले. प्रदेशाध्यक्ष डॉ. सुनील डोंगर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महासचिव उलगेशभाई चलवादी, संतोष शिंदे, मुकुंद सोनवणे, मंगेश ठाकरे, मोहन रायकवाड, कोषाध्यक्ष रौफभाई, सुधीर गायकवाड, जिल्हाध्यक्ष अरुण काळे, आरिफ मन्सुरी, धमेंद्र जाधव आदी उपस्थित होते.