नाशिक

BSNL, Achhe Din | राज्यात पंधरा दिवसांत सव्वा लाख नवे ग्राहक

पुढारी वृत्तसेवा
नाशिक : अमित यादव

जिओ, एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया या खासगी कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅनच्या दरात मोठी वाढ केल्याने त्याचा परिणाम ग्राहकांच्या खिशावर झाला आहे. मात्र, या दरवाढीचा फायदा सरकारी टेलिकॉम कंपनी असलेल्या 'बीएसएनएल'ला मोठ्या प्रमाणात झाला असून, गेल्या १५ दिवसांत राज्यात एक लाख १९ हजार ६६०, तर नाशिक जिल्ह्यात नऊ हजार २२५ ग्राहकांनी खासगी कंपनीच्या सेवेतून 'बीएसएनएल'मध्ये आपले सीम पोर्ट केले आहे. वाढत्या ग्राहकांच्या प्रतिसादाने बीएसएनएलला पुन्हा 'अच्छे दिन' येण्यास सुरुवात झाली आहे. (SIM ported to 'BSNL')

  • जिल्ह्यातील बीएसएनएल ग्राहक संख्या : ३ लाख ५३ हजार ७९९

  • राज्यातील बीएसएनएल ग्राहक संख्या : ५४ लाख १४ हजार ९९३

२८ जून रोजी जिओ, एअरटेल आणि व्हीआय यांनी दणक्यात आपले रिचार्ज प्लॅन महाग केल्याने त्याचा थेट फायदा बीएसएनएलला मिळत आहे. (SIM ported to 'BSNL') गेल्या अनेक वर्षांपासून खासगी कंपन्यांची दर्जेदार सेवा, कमी रिचार्ज दर, ५ -जी सेवा या बळावर त्यांनी बीएसएनएलसह इतर खासगी कंपन्यांचे ग्राहक फोडले होते. मात्र पंधरा दिवसांपूर्वी 'मक्तेदारी' झालेल्या या कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनचे दर २५ ते ३५ टक्क्यांपर्यंत वाढविल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले होते. त्यामुळे ग्राहकांनी पुन्हा आपला मोर्चा 'बीएसएनएल'कडे वळवला आहे.

महाराष्ट्रात दररोज साधारण सात ते नऊ हजार खासगी कंपन्यांचे ग्राहक बीएसएनएलमध्ये आपले कार्ड पोर्ट करत आहे. जुलै महिन्यातील पहिल्या १५ दिवसांतच राज्यात एक लाख १९ हजार ६६० खासगी कंपन्यांच्या ग्राहकांनी बीएसएनएलमध्ये सीम पोर्ट केले आहे. एकूणच जिओ, एअरटेल आणि वोडाफोन या खासगी कंपन्यांच्या दरवाढीच्या निर्णयामुळे सरकारी कंपनी असलेल्या बीएसएनएलला मोठा फायदा होताना दिसत आहे. इतकेच नाही तर सोशल मीडियातसुद्धा बीएसएनएल ट्रेंड होताना दिसून येत आहे. (SIM ported to 'BSNL')

गेल्या १५ दिवसांत बीएसएनएलच्या ग्राहकसंख्येत मोठी वाढ झाली आहे. दर्जेदार सेवा तसेच फोर-जी कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ग्राहकांनी बीएसएनएलच्या सेवेचा लाभ घ्यावा.
ए. पी. गायकवाड, उप महाप्रबंधक, नाशिक

नेटवर्क सुधारण्यावर भर

ग्राहकांना बीएसएनएलची दर्जेदार सेवा देण्यासाठी नाशिक शहरात ५२, ग्रामीण भागात नव्याने १३५ मनोरे उभारण्याचे काम सुरू आहे. तर ५९२ मनोऱ्यांद्वारे उच्च फोर-जी सेवा देण्यात येणार आहे.

जिल्ह्यात सर्वदूर फोर-जी सेवा

बीएसएनएलची जिल्ह्यात फोर-जी सेवा असली तरी, आदिवासी तालुके, दुर्गम भाग येथे फोर-जी सेवा पोहोचलेली नाही. त्यामुळे सप्टेंबरअखेरपर्यंत जिल्ह्यातील कोनाकोपऱ्यातही बीएसएनएलच्या फोर-जी सेवेचा लाभ ग्राहकांना घेता येऊ शकणार आहे.

टाटासोबत पुढील वर्षात ५ -जी सेवा

टाटा सन्सचे युनिट तेजस नेटवर्क्स बीएसएनएलसाठी देशातच नेटवर्क उपकरणे बनवण्याचा प्रयत्न करू आहे. फोर-जी सेवा सुरू केल्यानंतर, बीएसएनएल पुढील वर्षी ऑगस्टपर्यंत देशभरात ५-जी सेवा सुरू करण्याची तयारी करत आहे. दूरसंचार विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, बीएसएनएलचे फाेर-जी आणि ५-जी दोन्ही एकाच वेळी थोड्या फरकाने लॉन्च केले जाऊ शकतात. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलीमॅटिक्सने यासाठी टीसीएससोबत करार केला आहे, ज्यामध्ये रेडिओ उपकरणे आणि फोर-जी कोर उपकरणे बनवली जातील.

SCROLL FOR NEXT