पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीतील विजयाचा मूलमंत्र अमित शाह यांनी दिला.  File Photo
नाशिक

Amit Shah | विरोधकांचे कार्यकर्तेही फोडा, भाजपला जोडा : अमित शाह

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेते, खासदार, आमदारांना गळाला लावत महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणणाऱ्या भाजपने आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी विरोधी पक्षांचा 'कार्यकर्ता'रूपी पायाच खिळखिळा करण्याची व्यूव्हरचना आखली आहे. शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट तसेच काँग्रेसचे बूथस्तरावरील कार्यकर्ते फोडून या पक्षांचा पायाच आता नेस्तनाबूत करा आणि निवडणुका जिंका, असा कानमंत्र देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आणण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांना १५ कलमी कार्यक्रम दिला. राज्यात महायुती सरकार आणण्यासाठी फोडोफोडीचा मंत्र अंमलात आणावाच लागेल, असे ठामपणे सांगताना विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना प्रवेश दिल्याने भाजपचे काहीही बिघडणार नसल्याचे शाह यांनी स्पष्ट केले.

भाजप उत्तर महाराष्ट्र कार्यकर्ता संवाद बैठक बुधवारी(दि.२५) सातपूर येथील हॉटेल डेमोक्रसी येथे पार पडली. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीतील विजयाचा मूलमंत्र देताना शाह बोलत होते. भाजपचे स्वास्थ चांगले असल्याने सर्वकाही पचनी पडेल, राज्यात बहुमताने महायुतीची सत्ता येईल, असा दावाही शाह यांनी केला. महाराष्ट्रातील निवडणूक जिंकल्यानंतर २०२९ मधील लोकसभा निवडणुकीत तीनशेच्या पार खासदारांचा आकडा जाईल, असा विश्वास व्यक्त करताना केंद्रात सलग तिसऱ्यांदा आलेले मोदी सरकार वक्फ बोर्डाचा कायदा रद्द केल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक देशाचे भवितव्य ठरविणारी व पक्षाच्या वैचारिक लढाईला नवा आयाम देणारी आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाला अपयश आले. भाजपने या निवडणुकीत ४०० पारचा नारा दिला होता. जागांची संख्या घटली असली तरी आपण सलग तिसऱ्यांदा लोकसभेत सत्ताधारी बाकावर बसलो. त्यामुळे या यशाकडे बघून कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीविषयी मनात तीळमात्र शंका आणू नये. निराश होऊ नये. निवडणुकीला सामोरे जाताना विजयाचा आत्मविश्वास बाळगावा, असा कानमंत्र देताना विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी भाजपचा १५ कलमी कार्यक्रम शाह यांनी जाहीर केला. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जबाबदारी ओळखून काम करावे, विजय महायुतीचाच होईल, असा दावाही त्यांनी केला.

वक्फ बोर्ड कायदा रद्द करणारच

भाजपने आतापर्यंत कधीही काँग्रेसप्रमाणे सत्तेसाठी निवडणूक लढविली नाही. राहुल गांधी व शरद पवार यांच्या कंपनीने मोहब्बतच्या दुकानाच्या नावाखाली खोट्याचे दुकान लावले. तीन तलाक, काश्मीरमधील ३७० कलम हटविणे यासारखे महत्त्वाचे निर्णय भाजपच्या सत्ता काळात झाले. आता वक्फ बोर्ड कायदा रद्द केल्याशिवाय राहणार नाही, असेही शाह यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, निवडणूकप्रमुख रावसाहेब दानवे यांचीही भाषणे झाली. व्यासपीठावर भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आदी उपस्थित होते.

कार्यकर्त्यांना कानपिचक्या

भाजपचा उमेदवार पाडणे म्हणजे काँग्रेस व विरोधी पक्षांचा उमेदवार निवडून आणणे. त्यामुळे आपसातील भांडणे मिटवा, मनभेद-मतभेद दूर सारून एकसंधपणे कामाला लागा, अशा शब्दांत शाह यांनी कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. दोघांच्या वादामुळे उमेदवारी मिळणार नाही. परंतु, पक्षाचे वातावरण मात्र खराब होईल. तुमचे तिकीट देवेंद्र फडणवीस किंवा चंद्रशेखर बावनकुळे कापू शकत नाही तर, पक्षच कापू शकतो. त्यामुळे पक्षामुळेच उमेदवारी मिळेल असे सांगत, जो उमेदवारी मागेल त्याला उमेदवारी मिळणार नाही, जो मागणार नाही आणि केवळ पक्षाचे काम करेल त्यालाच उमेदवारी मिळेल, अशा शब्दांत शाह यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या.

असा आहे १५ कलमी कार्यक्रम

१. तीन दिवसांत मंडल पदाधिकाऱ्यांची बैठक घ्यावी.

२. प्रत्येक पदाधिकाऱ्याला एका शक्तिकेंद्राची जबाबदारी.

३. बूथप्रमुखांची बैठक घेऊन अ,ब,क,ड अशी वर्गवारी करा.

४. प्रत्येक अ बूथवर भाजपच्या १० टक्के मतांची वाढ करा.

५. प्रत्येक बूथवर ११ कार्यकर्त्यांची फळी उभारा.

६. कार्यकर्त्यांमार्फत १० दिवस परिसरात फेरी काढा.

७. शासकीय समित्या, बचतगटांवरील कार्यकर्त्यांना भाजपचा सदस्य बनवा.

८. दलित, नवबौध्द वस्त्यांमध्ये जाऊन १० नवीन कार्यकर्ते जोडा.

९. पं. दीनदयाळ यांच्या विचारांचे आचरण करा.

१०. सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवा.

११. दररोज दोन लाभार्थ्यांची भेटी घ्या.

१२. व्हॉटस‌्ॲप ग्रुप बनवून लोकांपर्यंत पोहोचा.

१३. निवडणूक वातावरणनिर्मितीसाठी भाजपच्या घोषणा देत राहा.

१४. शरद पवार गट, ठाकरे गटाचे कार्यकर्ते फोडा, भाजपत प्रवेश करा.

१५. आपल्या परिवारासह शेजारच्या चार घरांचे मतदान भाजपला पडेल याची जबाबदारी घ्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT