नाशिक : त्र्यंबकेश्वर येथे शेकडो वर्षांपासून ग्रामदेवता महादेवीच्या नावे गावजेवणाची परंपरा आहे. या अंतर्गत लोकवर्गणीतून जमा झालेल्या शिध्यातून जेवणाची व्यवस्था केली जात असे. पूर्वी या जेवणात विशिष्ट जातींसाठी स्वतंत्र स्वयंपाक व वेगळी पंगत ठेवण्याची प्रथा होती. मात्र, ही रूढी आता इतिहासजमा झाली आहे.
त्र्यंबकेश्वर येथे सध्या सर्व जाती आणि धर्मांतील ग्रामस्थ एकत्र बसून सहभोजन करत असून, सामाजिक ऐक्याचा सुंदर संदेश देत आहेत. परंपरेला जपत, नव्या विचारांना स्वीकारत गावकऱ्यांनी घेतलेला हा पुढाकार स्तुत्य ठरत आहे.
त्र्यंबकेश्वर येथील महादेवी ट्रस्टकडून दरवर्षी लोकवर्गणीच्या माध्यमातून गावजेवणाचे आयोजन केले जाते. या भोजन समारंभाला प्रयोजन असे म्हटले जाते. यामध्ये दरवर्षी सुमारे १० हजारांहून अधिक ग्रामस्थ सहभागी होतात. मात्र, या प्रयोजनात एका विशिष्ट समाजासाठी स्वतंत्र अन्न शिजवले जात होते. हे अन्न लोकवर्गणीतून जमा झालेल्या शिधामालामधूनच वापरून तयार केले जात असे आणि त्या समाजासाठी स्वतंत्र पंगतही बसवली जात होती. ही गोष्ट सामाजिक भेदभाव दर्शवणारी असून, गेल्या दोन वर्षांपासून अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील कार्यकर्त्यांनी या बाबीकडे लक्ष वेधले. या भेदभावाविरोधात तहसीलदार व पोलिस प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले होते. कार्यकर्त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे प्रशासनाने हस्तक्षेप केला आणि अखेर ही भेदभावाची प्रथा थांबवण्यात आली आहे.
गुरुवारी (दि. १७) गावजेवणाच्या कार्यक्रमात जातिनिहाय वेगवेगळ्या पंगती बसविण्याची चर्चा झाली होती. मात्र, 'अंनिस'ने याला विरोध करत सर्व गावकऱ्यांनी एकाच ठिकाणी शिजवलेल्या अन्नाचा आणि एकत्रित पंगतीचा लाभ घ्यावा, ही भूमिका मांडली. त्यांनी याबाबत तहसीलदार व पोलिस निरीक्षकांना निवेदन देऊन चर्चा केली. जातिनिहाय पंगती ही अमानवीय व राज्यघटनेविरोधी असल्याचे 'अंनिस'चे राज्य प्रधान सचिव डाॅ. ठकसेन गोराणे, राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे, कार्याध्यक्ष त्र्यंबकेश्वर संजय हरळे, दिलीप काळे यांनी स्पष्ट केले. तहसीलदार आणि पोलिसप्रमुखांनी संबंधित ट्रस्टींना कायदेशीर समज दिली. प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर ट्रस्टींनी एकोप्याचा निर्णय घेत सर्वांसाठी एकच पंगत ठेवली. त्यामुळे विशिष्ट समाजासाठी वेगळी पंगत बसवण्याची जुनी प्रथा संपुष्टात आली.
खरे तर ही कुप्रथा दोन वर्षांपूर्वी थांबविण्यात आली होती. परंतु, यावर्षी वेगवेगळ्या पंगती बसणार असल्याची चर्चा कानावर आल्याने, 'अंनिस'च्या जिल्हा व राज्य कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन आम्ही याविरोधात लढलो. त्यातून हे सामाजिक परिवर्तन झाले आहे.संजय हराळे, कार्याध्यक्ष, अंनिस ,त्र्यंबकेश्वर, नाशिक.