Nashik Political News : दोन्ही ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन File Photo
नाशिक

Nashik Political News : दोन्ही ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन

मनसे कार्यालयाच्या नवचंडीयाग पूजेत ठाकरे बंधूंना घातली साद

पुढारी वृत्तसेवा

Both the Thackerays should come together for the interest of Maharashtra and Hindutva, the feeling of the activists

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र हित व हिंदुत्वासाठी दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावे, अशी साद दोन्ही ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे बंधूंना घातली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजगड कार्यालयाच्या वास्तुशांती व नवचंडीयाग, सत्यनारायण महापूजेसाठी एकत्रित आलेल्या दोन्ही ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो झळकविला. तसेच एकमेकांची गळाभेट घेत, 'आम्ही एकत्र आलो, आता तुम्हीही या' जणू काही अशीच साद घातली.

ठक्कर बाजार येथील मनसेच्या राजगड कार्यालयाची गुरुवारी (दि.५) वास्तुशांती तसेच नवचंडीयाग व सत्यनारायण महापूजा आयोजित केली होती. महापूजेसाठी शहरातील राजकीय क्षेत्राबरोबरच अन्य क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित केले होते. विविध पक्षांचे कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांनी मनसे कार्यालयाला भेट दिली. मात्र, ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट सर्वात विशेष ठरली. ठाकरे सेनेचे उपनेते दत्ता गायकवाड, सुनील बागूल, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी महापूजेसाठी उपस्थिती लावली.

यावेळी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे आदींनी ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे बंधूंची प्रतिमा मनसे पदाधिकाऱ्यांना सुपूर्द केली. 'हिंदुत्व ठाकरे महाराष्ट्र' असा मजकूर प्रतिमेवर होता. मागील काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोघांनी एकत्र लढवाव्या, अशी इच्छा पदाधिकारी, कार्यकर्त्यांची आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गट आणि मनसे पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन झाले असून, आता ठाकरे बंधूंनी एकमेकांना टाळी द्यावी, अशी चर्चा यावेळी रंगल्याचे दिसून आले.

मनसेचा पुनश्चः हरिओम

तीन आमदार, महापालिकेत सत्ता असे वैभव असलेल्या मनसेला नंतरच्या काळात लागलेली उतरती कळा, अजूनही कायम आहे. स्थानिक स्तरावरील नेत्यांची फळी गेल्याने, पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी मोजकेच पदाधिकारी धडपड करीत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांअगोदर पक्षात जोश निर्माण व्हावा, यासाठी मनसेने 'पुनश्चः हरिओम 'चा नारा दिला आहे. यासाठी पक्षाच्या रंगरंगोटीपासून ते वास्तुशांती पूजेपर्यंत मनसेची धडपड सुरू आहे. अर्थात ही धडपड कार्यकर्त्यांमध्ये हुरूप निर्माण करणारी ठरत असून, आगामी महापालिका निवडणुकीत त्याचा कितपत लाभ होणार, हाच खरा प्रश्न आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT