Shalarth ID Scam Pudhari News Network
नाशिक

Nashik Bogus Shalarth ID scam | बोगस शालार्थ आयडी; संस्थाध्यक्ष अटकेत

मुदतीत आत्मसमर्पण न केल्याने कारवाई; तीन दिवसांची पोलिस कोठडी

पुढारी वृत्तसेवा

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा

महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या यशवंतराव नाना जाधव (या.ना. जाधव) विद्यालयातील चार कर्मचाऱ्यांच्या 'कथित' बेकायदा नियुक्त्या आणि बोगस शालार्थ आयडी प्रकरणात प्रमुख संशयित आरोपी असलेले संस्थाध्यक्ष सुनील माधवराव वडगे यांना जिल्हा आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने मंगळवारी (दि. १७) अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतरही निर्धारित मुदतीत आत्मसमर्पण न केल्याने ही कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते शेखर पाटील यांनी मे २०२५ मध्ये छावणी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. विद्यालयात पदे रिक्त नसतानाही चार कर्मचाऱ्यांची 'कथित' बेकायदा भरती करण्यात आली. तसेच त्यांना शालार्थ आयडी मिळवून देणे, मागील वेतनातील फरकाची रक्कम मिळवून देणे आणि वेतन निश्चिती करण्याच्या प्रकरणात अनियमितता झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यात तत्कालीन जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी तथा प्रभारी शिक्षण उपसंचालक नितीन पोपटराव बच्छाव, विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक हिरालाल सुकलाल वाघ, वरिष्ठ लिपिक नीलेश सोमनाथ वडगे, संस्थेचे सचिव जिभाऊ रघुनाथ अहिरे, अध्यक्ष सुनील माधवराव वडगे यांच्यासह कर्मचारी नितीन अशोक सूर्यवंशी, राजेंद्र शिवराम निकम, विनायक सुधाकर खैरे आणि अन्य दोघांचा समावेश असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

संस्थाध्यक्ष सुनील वडगे यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. उच्च न्यायालयाने २ नोव्हेंबर २०२६ रोजी त्यांचा अर्ज फेटाळत १५ नोव्हेंबरपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यांनी निर्धारित मुदतीत आत्मसमर्पण केले नाही. त्यानंतर जिल्हा आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास संगमेश्वर परिसरातून वडगे यांना अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू आहे.

मालेगाव हायस्कूलमधील मुख्याध्यापक जाहिद हुसैनला अटक न्यायालयाकडून सहा दिवसांची पोलिस कोठडी

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा

मालेगावच्या बहुचर्चित करत बडी शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई मालेगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक जाहिद हुसैन यांना अटक केली आहे. गेल्या ७५ दिवसांपासून फरार असलेल्या जाहिद हुसैन यांना ताब्यात घेतल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या स्वाधीन केले. बुधवारी (दि. १८) त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

शालार्थ आयडी आणि शिक्षक भरती प्रक्रियेत कोट्यवधी रुपयांचा 'कथित' गैरव्यवहार झाल्याचा आरोप असून, या प्रकरणाचा आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. बोगस शालार्थ आयडी तसेच शिक्षकांच्या नियुक्त्त्यांशी संबंधित गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे.

या प्रकरणात जाहिद हुसैन यांच्यावर तपास यंत्रणेचे लक्ष होते. मात्र, ते गेल्या ७५ दिवसांपासून फरार होते. अखेर स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना ताब्यात घेऊन आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविले. न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केल्याने तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या चौकशीतून शिक्षक भरती आणि शालार्थ आयडी प्रकरणातील 'कथित' आर्थिक व्यवहारांसह अन्य महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या प्रकरणात आठ महिला शिक्षिकांसह अन्य १२ आरोपी अद्याप फरार आहेत. त्यामुळे उर्वरित आरोपींचा शोध घेणे आणि 'कथित' गैरव्यवहाराची व्याप्ती उघड करणे, हे तपास यंत्रणांसमोरील प्रमुख आव्हान आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT