Video viral blackmailing case  
नाशिक

Ashok Kharat Case | नाशिकमध्ये खळबळ! ब्लॅकमेलर नीरज जाधव अद्याप फरार; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Ashok Kharat Case | या संवेदनशील प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या संशयितावर अद्याप ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्येही संभ्रम निर्माण झाले आहे.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भोंदू अशोक खरात यांच्या नावाशी संबंधित महिला लैंगिक शोषण प्रकरणात दररोज नवे आणि धक्कादायक पैलू समोर येत असतानाच, या प्रकरणातील कथित ब्लॅकमेलर नीरज जाधव याचा ठावठिकाणा अद्याप लागत नसल्याने तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या संवेदनशील प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या संशयितावर अद्याप ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्येही संभ्रम निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डी येथील एका युवतीला ब्लॅकमेल केल्याप्रकरणी नीरज जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतरच भोंदू अशोक खरात प्रकरणाचा मोठा भंडाफोड होण्यास सुरुवात झाली.

मात्र शहर पोलिस, ग्रामीण पोलिस आणि विशेष तपास पथक यांनी चौकशी करूनही अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणातील तपासाची दिशा आणि गती याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

नीरज जाधव हा गेल्या अनेक वर्षांपासून अशोक खरात याच्याकडे काम करत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यानेच महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ स्वतःच्या ताब्यात घेतले आणि त्याचाच वापर करून ब्लॅकमेलिंगचे जाळे उभे केले, असा संशय तपासातून व्यक्त होत आहे.

या माध्यमातून अनेक महिलांना धमकावून त्यांच्याकडून दबावाखाली वागणूक घेतली जात असल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान, अहिल्यानगर पोलिसांनी या प्रकरणाचा प्रारंभिक पर्दाफाश केला होता. विशेष म्हणजे, हे प्रकरण मागील वर्षीच उघडकीस येण्याच्या उंबरठ्यावर होते. मात्र, पोलिस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कथित हस्तक्षेपामुळे कारवाई थांबवण्यात आल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे.

संबंधित अधिकारी अनेकदा अशोक खरातसोबत सार्वजनिक व्यासपीठावर दिसल्याचेही सांगितले जात आहे, ज्यामुळे संशय अधिकच बळावला आहे. या सर्व घडामोडींमुळे तपास प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, महत्त्वाच्या संशयिताला अद्याप अटक का करण्यात आली नाही, याचे उत्तर शोधले जात आहे. या प्रकरणातील व्हिडिओंचा स्रोत, त्यामागील संपूर्ण रॅकेट आणि त्यातील इतर संभाव्य सहभागी यांचा उलगडा करणे हे तपास यंत्रणांसमोर मोठे आव्हान ठरत आहे.

नीरज प्रकरणातील महत्त्वाचा दुवा

या प्रकरणात आणखी मोठे आणि धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, मिरज ऊर्फ नीरज जाधव याचा शोध लागतो का आणि त्याच्याकडून नेमकी कोणती माहिती समोर येते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT