नाशिक : राज्य सहकारी आदिवासी महामंडळाच्या नाशिक कार्यालयाने खरेदी केलेले धान गुजरातच्या काळ्याबाजारात परस्पर विक्री होत असल्याचा आरोप सुरगाणा येथील स्थानिक नागरिकांकडून करण्यात आला आहे.
सुरगाणा येथून धान घेऊन निघालेला ट्रक सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथील रेणुका राइस मिलमध्ये भरडाईसाठी न पोहोचता तो गुजरातमधील वासदा येथे गुरुवारी (दि. 1) रात्री 2.30 च्या सुमारास काळ्याबाजारात विक्रीसाठी नेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
राज्य सहकारी आदिवासी महामंडळाच्या नाशिक प्रादेशिक कार्यालयामार्फत आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत 2024- 25 या हंगामात सुरगाणा तालुक्यातील 11 खरेदी केंद्रांवर आधारभूत किमतीनुसार सरासरी एक लाख तीन हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आले. या धान खरेदीसाठी प्रतिक्विंटल 2 हजार 300 रुपये अदा करण्यात आले. सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथील मे. रेणुका राइस मिल यांच्याशी आदिवासी विकास महामंडळाने करार केल्याप्रमाणे धान खरेदी केलेला तांदूळ मिलमध्ये भरडाईसाठी पाठविण्यात आला. भरडाई करून झाल्यानंतर धानाची तातडीने उचल करून एफआरके मिश्रित तांदूळ जिल्हा शासकीय गोदामात जमा करण्यात यावा असा नियम आहे. करारानुसार धान उचलल्यानंतर धान मिलपर्यंत पोहोच करण्याची संपूर्ण जबाबदारी मिलधारकाची आहे. मात्र, सुरगाण्याहून निघालेले धान हे मिलमध्ये न पोहोचता परस्पर गुजरातकडे गेले. गुजरात येथील काळ्याबाजारात या धानाची विक्री होत असल्याचा आरोप सुरगाणावासीयांकडून करण्यात आला आहे. आदिवासींनी सेंद्रिय पद्धतीने पिकविलेले अस्सल धान गुजरातमध्ये चढ्या दराने विक्री करण्यात येत आहे. त्या बदल्यात निकृष्ट दर्जाचा हलक्या प्रतीचा तांदूळ जमा करुन शासनाची व रेशनकार्डधारकांची फसवणूक केली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
सुरगाणा येथील केंद्रातून धानाचा ट्रक भरून सुरगाणा, उंबरठाण, बर्डीपाडा, खांबला, सीतापूर, वासदा या मार्गावरून उनाई, सोनगड, व्याराकडे जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याची खातरजमा करण्यासाठी जागरूक नागरिकांनी महाराष्ट्र ते गुजरात राज्यापर्यंत ट्रकचा पाठलाग केला. रात्री 2 ते 2.30 च्यादरम्यान गुजरातमधील वासदा येथे ट्रक आढळून आले. या खडतर मार्गावरून रात्री 12 ते 1 - 1.30 च्या सुमारास हे लोडिंग ट्रक आडमामार्गे खराब रस्त्याने का जात आहेत याची विचारणा करत नागरिकांनी चौकशी केली असता, आदिवासी विकास महामंडळाचे धान हे गुजरातच्या राइस मिल ठेकेदारांना परस्पर विकले जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
आदिवासी महामंडळाने धान खरेदी अंतर्गत खरेदी केलेल्या तांदळाची विक्री गुजरातच्या काळ्याबाजारात होत असल्याची चौकशी करण्यासाठी आदिवासी विभागाचे पथक सुरगाणा आणि सिन्नर येथे पाठवण्यात आले आहे. दुसरे पथक सोमवारी पाठवण्यात येणार आहे. धानचोरी होत असेल, तर ही बाब अतिशय गंभीर असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.लीना बनसोड, आदिवासी विकास आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक