नाशिक महानगरपालिका / Nashik Municipal Corporation Pudhari News Network
नाशिक

Nashik Municipal Corporation | 'महापालिका सत्तेत आम्हाला कुबड्या नको'

Nashik Municipal Corporation | महायुती म्हणून निवडणूक लढलो तेथे घटक पक्षांना सत्तेत सहभागी करून घेतले.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मनपाच्या सत्तेत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला सत्तेत सहभागी करून घेण्याच्या भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या उतावीळपणाला कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी ब्रेक लावला आहे. महायुती म्हणून निवडणूक लढलो तेथे घटक पक्षांना सत्तेत सहभागी करून घेतले.

नाशिकमध्ये स्वबळावर निवडणूक लढवली असून, ७२ जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे सत्तेत कोणाच्याही कुबड्यांची गरज नसल्याचे सांगत, शिंदेसेना आणि राष्ट्रवादीला सत्तेत सहभाग देण्यास त्यांनी नकार दिला आहे. नाशिक येथे रविवारी (दि. १) भाजप कार्यालयात प्रसारमाध्यमांशी महाजन यांनी संवाद साधला.

यावेळी त्यांनी नाशिकच्या महापौर तसेच सत्तास्थापनेबाबत भूमिका मांडली. आम्ही स्वबळावर ७२ जागा निवडून आणल्या. विरोधकांचे पाच ते सहा नगरसेवक संपर्कात आहेत. आम्ही बहुमतात असल्याने कोणाच्याही कुबड्यांची आवश्यकता नसल्याचे स्पष्टीकरण महाजन यांनी दिले. शिंदेसेना आणि राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी करण्याचा कोणताही प्रस्ताव मित्रपक्षांना दिला नसल्याचे सांगत, महाजन यांनी केदार यांच्या दाव्याची हवा काढून घेतली.

जळगावमध्ये महायुती म्हणून लढल्याने या ठिकाणी शिंदेसेना आणि राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी करून घेणार आहोत. त्यामुळे शिंदेसेनेला विरोधी बाकावर बसावे लागण्याची शक्यता आहे. इच्छुकांचे लॉबिंग सुरू मंत्री महाजन हे भाजप कार्यालयात आले असता महापौरपदासह स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुकांनी त्यांच्याकडे लॉबिंग केले.

महापौरपद सर्वसाधारण महिला आरक्षित असल्याने इच्छुक महिलांची गर्दी झाली होती. स्वीकृत नगरसेवकपदासाठी इच्छुक असलेल्यांनी भाऊ, आम्हाला स्वीकृतसाठी तरी संधी द्या, अशी गळ महाजन यांना घातली.

वरिष्ठांच्या चर्चेनंतर महापौरांची घोषणा

महापौरपदी कोणास संधी द्यायची याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. महापौर पदाबाबत मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. चर्चेनंतरच ६ फेब्रुवारीस महापौरांच्या नावाची घोषणा केली जाईल, असे मंत्री महाजन यांनी सांगितले. अद्याप या प्रक्रियेला वेळ आहे. मी मुंबईला जात असून, कोणाला संधी द्यायची याबाबत मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांशी चर्चा करणार आहे. त्यानंतर ज्या नावावर एकमत होईल त्याची घोषणा केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

राज ठाकरेंना टोला

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबाबत भाष्य करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर महाजन यांनी टीकास्त्र सोडले. दुसऱ्यांच्या पक्षात काय चालल आहे, हे बघण्यापेक्षा ठाकरेंनी आपल्या पक्षाकडे लक्ष द्यावे, असा टोला महाजन यांनी लगावला. मनसेचे आमदार निवडून येत नाही. नगरसेवक निवडून आले तरी ते दुसऱ्या पक्षात जातात यावर ठाकरे यांनी चिंतन करावे. नाशिकमध्ये मनसेचा निवडून आलेल्या एकमेव महिला नगरसेविका आमच्याकडे येण्यास उत्सुक असल्याचा दावा महाजन यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT