नाशिक : भारतीय सैन्याला चार दिवस भेटले असते तर पीओके काय तर, लाहोर आणि कराचीवर देखील ताबा मिळवला असता. पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावापुढे सरकारने कच खाल्ली, असा पुनरूच्चार करत भाजपला तिरंगा यात्रा काढून चालणार नाही. ट्रम्पचा झेंडा हाती घ्यावा लागेल. भाजप सरकारने तिरंग्याचा अपमान करत ट्रम्पसमोर शरणागती पत्करली, त्यामुळे भाजपला तिरंगा यात्रा नव्हे तर, गावागावात डोनाल्ड जत्रा भरवाव्या लागतील, अशी कोपरखळी शिवसेना ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी मारली आहे.
एका खासगी कार्यक्रमाच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर आलेल्या खा. राऊत यांनी भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवरून केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला. पाकिस्तानशी आता पाक व्याप्त काश्मिर प्रश्नावरच चर्चा शक्य असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर राऊत यांनी खिल्ली उडविली. भारतीय सैन्याला आणखी चार दिवस मिळाले असते तर, पाक व्याप्त काश्मिरच काय तर लाहोर आणि कराचीवर देखील ताब्या मिळविला असता. परंतू ट्रम्पच्या दबावापुढे सरकारने कच खाल्ली. आता पीओके मागताना ट्रम्पला विचारले का, ट्रम्पचे पुढचे ट्विट बघावे लागेल, अशी उपरोधक टीका देखील राऊत यांनी केली. सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यात निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे नाशिक, धुळे, मालेगाव अशा उत्तर महाराष्ट्रातील सर्व निवडणुका शिवसेना ताकदीने लढवेल. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटनात्मक बांधणी केली जात असून पक्षस्तरावर स्थानिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जात आहे. नाशिकला मोठे शिबिर झाले. त्यानुसार प्रत्येक महापालिकेअंतर्गत शिबिरांचे आयोजन केले जाईल, असे राऊत म्हणाले.
शरद पवार यांच्या एका मुलाखतीतील ओळीवरून माध्यमे सुतावरून स्वर्ग गाठत आहेत. ते जातियवादी, धर्मांध शक्तिंबरोबर जाणार नाहीत. ज्या विचारांसाठी त्यांनी संघर्ष केला. अनेक वर्षे विरोधी पक्षात राहिले, ते आता महाराष्ट्र द्वेष्ट्या शक्तिंबरोबर, पक्षाची मोडतोड करणाऱ्यांसोबत जाणार नाहीत, असा दावा देखील राऊत यांनी केला.
शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीवरही राऊत यांनी भाष्य केले. शिवाजी पार्कला चांगले हॉटेल आहेत. तिथे उत्तम खिचडी मिळते. लोक तिथे फिरायला जातात. तसे उदय सामंतही येत असतील. लोकशाहीत कोणी कोणाकडे जाण्यावर बंधन नाही. या छुप्या राजकारणातच त्यांचा पराभव दिसतो आहे. यापुढे तुमच्या पक्षाची निशाणी खिचडी ठेवा, अशी टीका राऊत यांनी केली.