नाशिक : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना भाजपविरोधात एकीचे बळ दाखवणार्या महाविकास आघाडीतील उद्धव सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह मनसेला धक्का देत भाजपने जोरदार मास्टरस्ट्रोक मारला आहे. उद्धव सेनेचे प्रदेश संघटक तथा माजी महापौर विनायक पांडे, अॅड. यतीन वाघ, काँग्रेसचे माजी गटनेते शाहू खैरे, राष्ट्रवादी शरद पवार गटातील माजी आमदार नितीन भोसले यांच्यासह मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांना प्रवेश देत कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडीला खिंडार पाडले आहे.
दरम्यान, या पक्षप्रवेशाला निवडणूक प्रमुख आमदार देवयानी फरांदे यांच्यासह भाजपच्या निष्ठावंतांनी जोरदार विरोध दर्शवल्याने हायव्होल्टेज ड्रामा रंगला. अखेर फरांदे यांच्या अनुपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पाडला गेला. आपला कुणाच्याही पक्षप्रवेशाला विरोध नाही. पक्षातील निष्ठावंतांवर अन्याय होऊ नये हीच आपली भूमिका होती, असे सांगताना भावुक झालेल्या आ. फरांदे यांना अश्रू अनावर झाले. नाशिक महापालिका निवडणुकीसाठी 100 प्लसचा नारा देणार्या भाजपने गुरुवारी (दि.25) सर्वात मोठा प्रवेशसोहळा आयोजित केला होता.
आमदार फरांदे यांनी महाजन यांच्याशी चर्चा करत प्रवेशसोहळा थांबवण्याची विनंती केली. मात्र, महाजन यांनी नाशिक महापालिकेत 100 प्लसचा नारा वास्तवात उतरवण्यासाठी निवडून येण्याची क्षमता असलेल्यांना उमेदवारी हाच निकष असल्याचे नमूद करत प्रवेशसोहळा थांबणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे नाराज झालेल्या आ. फरांदे प्रवेशसोहळ्यास अनुपस्थित राहिल्या. आ. सीमा हिरे, आ. राहुल ढिकले, शहराध्यक्ष सुनील केदार, लक्ष्मण सावजी, बाळासाहेब सानप, विजय साने, सुधाकर बडगुजर, प्रदीप पेशकार यांच्या उपस्थितीत हा प्रवेशसोहळा पार पडला.