सटाणा : पुढारी वृत्तसेवा
ग्रामीण रुग्णालयातील राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कार्यरत दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतील अनियमितता बायोमेट्रिक नोंदींतून समोर आली आहे. प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश काकुळते यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीनंतर हा प्रकार उघडकीस आला.
काकुळते यांनी आरोग्य उपसंचालक, सिव्हिल सर्जन, जिल्हा आरोग्याधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. तक्रारीबरोबर संबंधित कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतील अनियमितते-संदर्भातील प्राथमिक पुरावेही जोडले होते. तक्रारीची दखल घेत वरिष्ठ स्तरावरून ग्रामीण रुग्णालय प्रशासनाकडे बायोमेट्रिक उपस्थिती नोंदी मागविण्यात आल्या होत्या.
वैद्यकीय अधीक्षकांनी दि. १ जून २०२५ते ३१ मे २०२६ कालावधीतील बायोमेट्रिक उपस्थिती नोंदींची तपासणी करून, दि. ८ जून २०२६ रोजी वरिष्ठ कार्यालयाकडे सविस्तर अहवाल सादर केला. या अहवालात दोन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतील गंभीर अनियमितता अधोरेखित करण्यात आली आहे. अहवालानुसार, सुट्या वगळता, २९० दिवसांपैकी आशा सूर्यवंशी ६० दिवस अनधिकृत गैरहजर राहिल्या आहेत. हे प्रमाण २१ टक्के आहे. प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या २३० दिवसांपैकी ६४ दिवस त्या उशिरा उपस्थित असल्याची नोंद असून, हे प्रमाण २७.८३ टक्के आहे.
१८९ दिवस म्हणजे ८२.१७टक्के कार्यदिवस त्या वेळेपूर्वी निघून गेल्याचे आढळले आहे. जयश्री म्हस्के यांच्या बाबतीत ९९ दिवस अनधिकृत गैरहजेरी नोंदविण्यात आली असून, हे प्रमाण ३४ टक्के आहे. प्रत्यक्ष उपस्थितीच्या १८९ दिवसांपैकी १६७दिवस त्या उशिरा आल्या असून, हे प्रमाण ८७.४३ टक्के आहे. १८० दिवस म्हणजे ९४.२४ टक्के कार्यदिवस त्या वेळेपूर्वी निघून गेल्याचे बायोमेट्रिक नोंदींत नमूद केले आहे.
अहवालातील निरीक्षणांनुसार अनेक दिवस कर्मचाऱ्यांनी दुपारनंतर दीर्घकाळ अनुपस्थिती ठेवली असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत रुग्ण समुपदेशन, मधुमेह व रक्तदाब रुग्णांचा फॉलो-अप, तपासणी मोहिमा आणि विविध आरोग्य योजनांची अंमलबजावणी अपेक्षित प्रमाणात झाली का, याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
संबंधित कर्मचारी ९ ते १० वर्षांपासून ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असून, नागरिकांकडून यापूर्वीही त्यांच्या उपस्थितीबाबत तक्रारी होत असल्याचे सांगितले जाते. यावर्षी फेस बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली सुरू झाल्यावर या अनियमितता अधिकृत नोंदींसह समोर आल्या आहेत. दरम्यान, काकुळते यांनी संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर प्रशासकीय कारवाईची मागणी केली आहे.
वैद्यकीय अधीक्षकांच्या अहवालातील निष्कर्षांच्या आधारे संबंधित कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती नाकारून सेवेतून कमी करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच बायोमेट्रिक नोंदींच्या आधारे संबंधित कालावधीत देण्यात आलेल्या मानधन व वेतनाची पडताळणी करून नियमबाह्य लाभ घेतल्यास त्याची वसुली करण्याबाबतही कायदेशीर आणि प्रशासकीय कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली आहे. वैद्यकीय अधीक्षकांनी सादर केलेला अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला असून, आता पुढील प्रशासकीय निर्णयाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.