नाशिक : जिल्हयातील ११ नगरपंचायती आणि नगर परिषदांच्या पंचवार्षिक निवडणुकांसाठी रणधुमाळी सुरू असून, प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सोमवारी (दि. 1) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेणार आहेत. सिन्नर येथील सभेत मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी भाजप हा बाटलेला पक्ष असल्याचा आरोप केला होता. त्यांच्या आरोपाला मुख्यमंत्री फडणवीस सिन्नर येथील सभेतून काय प्रत्युत्तर देतात याकडे लक्ष लागले आहे.
नगर परिषांसाठी जाहीर प्रचाराची सांगता सोमवारी (दि. 1) रात्री 10 वाजता होईल. मंगळवारी (दि. २) मतदान आणि बुधवारी (दि. ३) निकाल लागणार आहे. त्यामुळे सोमवारी अखेरच्या दिवशी जनतेला गळ घालण्यासाठी उमेदवारांची धडपड असणार आहे. जिल्ह्यातील बागलाण, मनमाड, नांदगाव, येवला, चांदवड, पिंपळगाव बसवंत, ओझर, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नर आणि भगूरसह ११ नगर परिषदांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये थेट लढत आहे, तर छोट्या नगरपंचायतींमध्ये स्थानिक पातळीवरील गट-तटांनी निवडणूक रंगतदार झाली आहे. भाजप, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी या प्रमुख पक्षांसह अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवारही प्रभावीपणे लढत होत आहे.
अनेक ठिकाणी महायुतीतील घटक पक्षांचे उमेदवार एकमेकांसमोर ठाकले गेले आहे. पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वर येथे सभा घेतली, तर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नांदगाव, सटाणा येथे सभा घेतल्या होत्या. सोमवारी प्रचाराचा अखेरचा दिवस आहे. या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री शिंदे व पवार हे नाशिकच्या मैदानात उतरणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस हे सिन्नर व पिंपळगाव बसवंत येथे उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेणार आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे हे त्र्यंबकेश्वला दुपारी 12.30 वाजता सभा घेतील. उपमुख्यमंत्री पवार हे भगूरला सायंकाळी 5 वाजता, तर ओझर येथेही ते सभा घेणार आहेत.
संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त पोलिस फौजफाटा
जिल्ह्यात एक हजारहून अधिक उमेदवार रिंगणात उतरले आहेत. मतदानासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून, संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. संपूर्ण जिल्ह्यात प्रचार शांततेत संपल्यानंतर मंगळवारी (दि. २) डिसेंबरला मतदार कोणत्या आश्वासनांना मतदान करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बुधवारी (दि. ३) जसजसे निकाल लागतील त्यावेळी चित्र स्पष्ट होईल.