ठळक मुद्दे
राज्यातील दहा वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश
नाशिक जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेत शासनाचे मोठे फेरबदल
नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आयुक्तपदी बदली
नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेत शासनाने मोठे फेरबदल केले आहेत. नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली असून, जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची नाशिक जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. एनएमआरडीएचे आयुक्त डॉ. माणिक गुरसळ यांची आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर, कुंभमेळा प्राधिकरणाच्या आयुक्तपदी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची नियुक्ती झाली आहे.
राज्यातील दहा वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश शासनाकडून मंगळवारी (दि.७) जारी करण्यात आले आहेत. त्यात नाशिकमधील तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. नाशिकमध्ये सन २०२६-२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत असून, त्या संदर्भातील तयारी प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. कुंभमेळा यशस्वी होण्यासाठी राज्य सरकारने सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाची स्थापना केली असून, या प्राधिकरणाचे अध्यक्षपद विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे देण्यात आले आहे. तर कुंभमेळा प्राधिकरणाच्या प्रभारी आयुक्तपदी ११ जून रोजी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांची नियुक्ती केली होती. नायर यांच्याकडे महापालिकेसह कुंभमेळ्याची अतिरिक्त जबाबदारी होती. परंतु, आता कुंभमेळा जवळ आल्यामुळे शासनाने प्राधिकरणात पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची पूर्णवेळ आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. शेखर सिंह हे ऑगस्ट २०२२ पासून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदावर कार्यरत होते. पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीचे सीईओ म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. कुंभमेळा प्राधिकरणाला आता पूर्णवेळ आयुक्त मिळाल्याने सिंहस्थ कामांना आता वेग येणार आहे.
यामुळे जलज शर्माची नाशिकमध्येच बदली....
जलज शर्मा यांचा जिल्हाधिकारीपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे त्यांच्याकडे एनएमआरडीएचे आयुक्तपद देण्यात आले आहे. या आधी शर्मा यांच्या पत्नी आणि नाशिक महापालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांनी या पदावर काम केले आहे. खत्री यांच्यानंतर डॉ. गुरसळ हे नऊ महिन्यांपासून या पदावर कार्यरत होते. शासनाने पती-पत्नी एकत्रीकरणांतर्गत शर्मा यांना नाशिकमध्येच कायम ठेवल्याचे चित्र आहे.
डॉ. माणिक गुरसळ आदिवासी विकास महामंडळात
एनएमएआरडीच्या आयुक्तपदावर ७ जानेवारी २०२५ रोजी डॉ. माणिक गुरसळ यांची नियुक्ती झाली होती. गुरसळ यांनी अल्पकालावधीत एनएमआरडीएचा विकास आराखडा तयार करायला सुरुवात केली होती. तसेच सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर एनएमआरडीए हद्दीतील रस्त्यांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते. गुरसळ यांची आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकरपदावर नियुक्ती देण्यात आली आहे.