नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण झालेले नाही आणि त्यापूर्वीच कोण कोणत्या पदावर बसणार हेही ठरवून टाकले होते. उपमुख्यमंत्री कोण आणि राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार हेदेखील ठरले असेल. कोणी काही सांगितले तर आपण त्यावर काय बोलणार, अशी उपहासात्मक टिप्पणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी करत रोहित पवार यांच्या दाव्याची खिल्ली उडवली.
गुरुवारी नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना भुजबळ म्हणाले, रोहित पवार म्हणतात, त्यांच्यासोबत अजितदादांनी काही ठरवले होते. मात्र, अजितदादांनी आम्हाला काहीही सांगितले नव्हते. तसे काही ठरले होते याबाबत आम्हाला कसलीच माहिती नाही. आता सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम सुरू केले आहे. त्यामुळे त्यांना पूर्णपणे सहकार्य करणे हे आमचे कर्तव्य आहे. यापुढे कोणता निर्णय घ्यायचा हे त्या ठरवतील, असेही भुजपळ यांनी स्पष्ट केले.
अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून सीबीआयच्या चौकशीची मागणी केली आहे. शंका उपस्थित करण्यापेक्षा संबंधितांकडे जी माहिती आहे, ती त्यांनी तपास यंत्रणांना दिली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
ब्लॅक बॉक्स नष्ट होत नाही या जय पवार यांच्या विधानावर बोलताना भुजबळ म्हणाले, ब्लॅक बॉक्स नष्ट होत नाही हे खरे आहे. आगीचा प्रादुर्भाव प्रचंड असल्यामुळे तो थोडा खराब झाला असेल. अशा परिस्थितीत अमेरिकेत यंत्रणा आहेत आणि ब्लॅकबॉक्समधील डेटा त्या तपासून सत्य समोर आणू शकतात. राज्य व केंद्र सरकार यामध्ये पूर्णपणे काळजी घेत आहेत. कोणाच्या काही चुका आहे का, मुद्दामहून कोणी काही केले का, हा एक भाग आहे. दुसरा भाग पायलटने काही चूक केली का, विमानामध्ये रडारमध्ये काही चुका झाल्या का या दोन्ही मार्गाने चौकशी होईल. जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई होईल, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.