नाशिक : छगन भुजबळ हे शंभर टक्के ओबीसीचे नेते आहेत. मात्र, त्यांचा पक्ष ओबीसीवादी आहे का हे तेच सांगू शकतात. ओबीसींचे आरक्षण टिकावे यासाठी ते लढा देत असून, ओबीसींच्या आरक्षणाच्या रक्षणासाठी भुजबळांनी सत्तेतून बाहेर पडून आमच्या सोबत यावे अशी खुली ऑफर ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भुजबळांना दिली. नाशिक दौऱ्यावर आलेले ॲड. आंबेडकर यांनी आदिवासी संघटनांनासोबत घेत सोमवारी (दि.26) माध्यमांशी संवाद साधला.
ॲड. आंबेडकर म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणात यापुढे एससी, एसटी आणि ओबीसी एकत्र आल्याने मोठा बदल घडलेला दिसेल. सत्ताधारी आदिवासी समाजाला केवळ एक आरक्षित मतदारसंघ म्हणून बघतात. मात्र, आता आदिवासी संघटना वंचितसोबत आल्याने आमची ताकद वाढली आहे. त्यामुळे भुजबळांनी आमच्या सोबत यावे असे अवाहन त्यांनी केले. तसेच भविष्यात जो कोणी सत्तेत येईल त्याला आमच्या मागण्या मान्य कराव्या लागतील. खुल्या मतदारसंघातूनदेखील आदिवासींना लढण्याचा अधिकार आहे. आदिवासींना अर्थसंकल्पामध्ये देण्यात येणार्या निधीपैकी 72 टक्के जलसिंचन, पीडब्ल्यूडी आणि प्रशासकीय कामकाजावर खर्च केला जातो. यामुळे आदिवासींच्या विकासाला निधीच शिल्लक रहात नाही. आदिवासींसाठी निधी वाढविण्यासाठी आदिवासा अर्थसंकल्प कायदा करावा लागेल. पेसा भरतीबाबत सुरू असलेल्या आंदोलनालाही यावेळी पाठिंबा जाहीर करण्यात आला.
आदिवासींची खोटे सर्टिफिकेट घेऊन शासकीय नोकरी बळकाविणार्या 1 लाख 25 हजार कर्मचार्यांना शासनाने जनरल कॅटेगरीत टाकले आहे. यामुळे आदिवासींच्या जागा रिक्त झाल्या आहेत. या रिक्त जागांवर भरती करण्याची मागणीही आंबडेकरांनी केली. आदिवासींची पुढील बैठक सप्टेंबरच्या तिसर्या आठवड्यात नागपूरमध्ये होणार असून त्यानंतर एससी, एससी, ओबीसी एकत्र येऊन ताकद तयार करतील, अशी माहिती आंबडेकरांनी दिली.
लाडकी बहीण योजनेसाठी निधी देताना आदिवासींच्या बजेटमध्ये कपात केली का, असा सवालही यावेळी प्रकाश आंबडेकरांनी सत्ताधार्यांना केला. यावेळी एकलव्य आघाडी, भारत आदिवासी पार्टी, आदिवासी एकता परिषद, गोडवाना गणतंत्र पार्टी, महाराष्ट्र आदिवासी अभियान, एकलव्य भिल्ल सेना, आदिवासी एकता परिषदेचे नेते उपस्थित होते.