Ashok Kharat Pudhari
नाशिक

भोंदू खरातकडून ‘सीए’ची पावणेनऊ कोटींची फसवणूक

Nashik crime | आई-वडिलांच्या मृत्यूची भीती दाखवत पूजेसाठी उकळल्या मोठ्या रकमा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्यासाठी अवतारपूजा व विशेष धार्मिक विधी करावे लागतील, असा बनाव करून भोंदू अशोक खरातने आपला सीए ललित प्रकाश पोफळे (४८, रा. वैनगंगा सोसायटी, वरळी, मुंबई) यांच्याकडून तब्बल ८ कोटी ७६ लाख ५ हजार ५६० रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नरबळी व जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी पोफळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची आयडीबीआय बँकेतील अधिकारी अभय बोंगीरवार यांच्याशी ओळख झाली होती. गप्पांदरम्यान बोंगीरवार यांनी नाशिक येथील अशोक खरातबद्दल माहिती देत त्याची भेट घेण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर दोघे नाशिकला येऊन कॅनडा कॉर्नर येथील ओकस प्रॉपर्टी कार्यालयात गेले होते. तेथे खरातने स्वतःकडे दैवीशक्ती असल्याचा दावा करीत मीरगाव येथील ईशान्येश्वर संस्थानाचा संस्थापक असल्याचे सांगितले. समुद्रशास्त्र, अंकशास्त्र व ज्योतिषाच्या आधारे तो अचूक भाकीत करतो, असा विश्वास निर्माण केला.

पोफळे यांच्या म्हणण्यानुसार, पुढील भेटीत खरातने ‘तुमचा जन्म नाशिकमध्येच झाला आहे’ असे अचूक सांगून, त्यांचा विश्वास अधिक दृढ केला. तसेच एकदा घरी बोलावून हातचलाखीने काजूकतलीचा प्रसाद देत दैवीशक्तीचा आभास निर्माण केला. हळूहळू त्याने, ‘तुमच्या आई-वडिलांना मृत्युयोग आहे’ अशी भीती दाखवली. हा योग टाळण्यासाठी अवतारपूजा, गंडांतर शांती व विविध धार्मिक विधी करावे लागतील, असे सांगून वेळोवेळी मोठ्या रकमा घेतल्या. जुलै २०१७ ते १ ऑगस्ट २०२४ या कालावधीत विविध ठिकाणी बोलावून एकूण ८.७६ कोटी रुपये उकळल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

याशिवाय, मालमत्ता व्यवहारातील २० लाखांच्या डिमांड ड्राफ्टचा गैरवापर करून बंगळुरू न्यायालयात खोटा दावा दाखल केल्याचेही समोर आले आहे. संबंधित कागदपत्रे बनावट असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, पोलिस उपायुक्त परिमंडळ-२ यांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. आंचल मुदगल व सहायक पोलिस निरीक्षक चेतन श्रीवंत करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT