नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भोंद अशोक खरात याच्याविरुद्ध दाखल चौथ्या गुन्ह्यात त्याला सोमवारी अटक दाखविण्यात आली असून, तो गेल्या २५ दिवसांपासून कोठडीत आहे. यापूर्वी तिसऱ्या गंभीर गुन्ह्यात न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. सोमवारी (दि. १३) खरातला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले.
नाशिक शहरात खरातवर ११ गुन्हे दाखल असून, सातव्यांदा तो न्यायालयात हजर होईल. यात तीन वेळेस त्याला प्रत्यक्ष, तर तीनवेळेस व्हिसीद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. एसआयटीकडून न्यायालयात सांगण्यात आले की, तिसऱ्या गुन्ह्याचा तपास अद्याप प्राथमिक स्तरावर असून, काही महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत.
विवाहित महिलेवर अत्याचार व जादूटोणा केल्याच्या गुन्ह्यात खरातचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्याचा ताबा देण्याची मागणी करण्यात आली. या प्रकरणात पीडितेचा विश्वासघात करून अत्याचार तसेच गर्भपात घडवून आणल्याचा आरोप आहे.
संशयित खरातच्या वकिलांनी मात्र न्यायालयात बाजू मांडताना सांगितले की, आतापर्यंत दाखल सर्व गुन्ह्यांमध्ये आरोपीने पोलिस तपासाला सहकार्य केले आहे, त्यामुळे त्याला पुन्हा पोलिस कोठडी देण्याची गरज नाही. सरकारी बाजू मांडताना अॅड. शैलेंद्र बागडे यांनी नमूद केले की, आरोपीवर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून, तपासाच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बाबी अजून स्पष्ट व्हायच्या आहेत.
त्यामुळे पुढील चौकशीसाठी त्याचा ताबा आवश्यक आहे. दरम्यान, चौथ्या गुन्ह्यात पीडित महिलेला अश्लील पद्धतीने स्पर्श करणे, तिचा अपमान करणे तसेच "दैवी शक्ती"ची भीती दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल या गुन्ह्याचा तपास सुरू असून, मंगळवारी (दि. १४) पुन्हा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी होणार आहे.
अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकवून अत्याचार
चौथ्या गुन्ह्याप्रकरणी भोंदू खरातला मंगळवारी न्यायालयात व्हिसीद्वारेच हजर केले जाईल. यात एसआयटी सात दिवसांची पोलिस कोठडी मागू शकते. चौथा गुन्हाही गंभीर स्वरूपाचा असून नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जाट्टोणा प्रतिबंध अधिनियमान्वे त्याच्यावर २३ मार्च २०२६ रोजी गुन्हा दाखल आहे. कौटुंबिक अडचणी सोडवण्यासाठी भोंदू अशोक खरातकडे गेलेल्या महिलेचा विश्वास संपादन करून तिचे शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार या गुन्ह्यात समोर आला आहे.
पहिल्या भेटीत साधी माहिती घेऊन आठ दिवसांनी बोलावलेल्या खरातने दरम्यान महिलेची सविस्तर माहिती मिळवली. दुसऱ्या भेटीत तिच्या आयुष्यातील गोष्टी सांगून दैवी शक्ती असल्याचा आभास निर्माण केला. त्यानंतर महिलेचा विश्वास जिंकून कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयात तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. नाही मानले तर भूतबाधा होईल" अशी भीती दाखवत तिला धमकावण्यात आले. पोलिसांनी अंधश्रद्धा, फसवणूक व मानसिक-शारीरिक छळाचा गुन्हा नोंदवला आहे.