Nashik News: सफाई कामगारांच्या तीन महिन्यांच्या थकीत वेतनाचा प्रश्न मार्गी; २५ लाख ७६ हजारांचा निधी उपलब्ध Pudhari
नाशिक

Nashik News: सफाई कामगारांच्या तीन महिन्यांच्या थकीत वेतनाचा प्रश्न मार्गी; २५ लाख ७६ हजारांचा निधी उपलब्ध

भाऊसाहेब चौधरींच्या पाठपुराव्याला यश

पुढारी वृत्तसेवा
सुनील थोरे

चांदवड : शहराच्या स्वच्छतेसाठी पहाटेपासून राबणाऱ्या सफाई कामगारांच्या तीन महिन्यांपासून रखडलेल्या वेतनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला. शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, नगरपरिषदेने २५ लाख ७६ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे ५० कंत्राटी सफाई कामगारांच्या खात्यावर तीन महिन्यांच्या थकीत वेतनाची रक्कम जमा झाली.

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर वेतन मिळाल्याने सफाई कामगारांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटले. याच कृतज्ञतेतून श्री संत गाडगेबाबा चौक येथे आयोजित कार्यक्रमात सफाई कामगार भगिनींनी भाऊसाहेब चौधरी यांच्या हातावर राखी बांधली. ही राखी केवळ रक्षाबंधनाच्या सणाची नव्हती, तर अडचणीच्या काळात आपल्या हक्कासाठी पाठीशी उभ्या राहिलेल्या भावाप्रती व्यक्त केलेल्या विश्वासाची आणि माणुसकीची होती.

शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणाऱ्या या कामगारांचे वेतन तीन महिन्यांपासून थकीत होते. घरखर्च, मुलांचे शिक्षण आणि दैनंदिन गरजा भागविताना वेतन रखडल्याने त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले होते. हा प्रश्न केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष मार्गी लागावा, यासाठी भाऊसाहेब चौधरी यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून निधी उपलब्ध झाला आणि कामगारांच्या खात्यावर वेतन जमा करण्यात आले.

दरम्यान, सफाई कामगारांची दैनिक मजुरी ६२२ रुपये करण्याच्या निर्णयालाही गती मिळाली आहे. त्यामुळे आगामी काळात या कामगारांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्यास मदत होणार आहे. यावेळी बोलताना भाऊसाहेब चौधरी म्हणाले, “केवळ एका दिवसापुरता रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यापेक्षा या बहिणींच्या हक्काचे पैसे त्यांना वेळेवर मिळवून देणे आणि त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहणे, हीच माझ्यासाठी रक्षाबंधनाची खरी भेट आहे.”

रक्ताचे नाते नसतानाही संकटाच्या वेळी जो पाठीशी उभा राहतो, तोच खरा भाऊ, या भावनेचा प्रत्यय चांदवडमध्ये आला. हक्काचे वेतन मिळाल्यानंतर बहिणींनी राखी बांधून व्यक्त केलेली कृतज्ञता आणि भाऊसाहेब चौधरी यांनी केलेला पाठपुरावा यामुळे रक्षाबंधनाच्या निमित्ताने माणुसकीच्या नात्याचा हृदयस्पर्शी अनुभव पाहायला मिळाला.

यावेळी नगरसेवक संदीप उगले, सुधीर कबाडे, प्रदीप बनकर, राजू बागवान, नगरसेविका पल्लवी मोरे, सुनील मोरे, शिवसेना तालुकाप्रमुख निलेश ढगे, शहरप्रमुख दीपक शिरसाठ, निखिल राऊत, देवा पाटील, प्रशांत ठाकरे यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT