Bhatke Vimukta Divas | भटके विमुक्त दिन Pudhari News Network
नाशिक

Bhatke Vimukta Divas | राज्यात दीड लाख 'व्हीजेएनटी' नाहीत सरकारी कागदपत्रे

आज पहिला भटके विमुक्त दिन : नाशिकमध्ये १७०० नागरिकांकडे आयुष्यमान कार्डही नाही

पुढारी वृत्तसेवा

ठळक मुद्दे

  • राज्य व जिल्हास्तरावर ३१ ऑगस्ट रोजी ‘भटके विमुक्त दिवस’ म्हणून साजरा करण्यात येत आहे.

  • शासन निर्णय निर्गमित : इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांची माहिती

  • भटके विमुक्त समाजाच्या सामाजिक न्याय, आत्मसन्मान आणि प्रतिष्ठेसाठी एक निर्णायक टप्पा

नाशिक : निल कुलकर्णी

राज्यातील व्हीजेएनटी अर्थात भटक्या- विमुक्त जातीतील १ लाख ४१ हजार ३१५ नागरिकांकडे अद्यापही आधार, मतदान ओळखपत्र, जात प्रमाण आदी मुलभूत सरकारी कागदपत्रे नसल्याचे धक्कादायक वास्तव भटके- विमुक्त विकास परिषदेने २०२४ मध्ये राज्यातील ५६७ वस्त्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. (VJNT - Vimukta Jati and Nomadic Tribes)

राज्यसरकार यंदा प्रथमच ३१ ऑगस्ट हा दिवस भटके- विमुक्त जाती दिन म्हणून शासकीय स्तरावर साजरा करत आहे. देशात अन्य राज्यात हा दिन साजरा केला जातो. परंतु, यंंदा रविवारी (दि. ३१) राज्य सरकारकडून प्रथमच यंदा शासकीय पातळीवरुन हा दिवस साजरा होत आहे. यानिमित्ताने भटके- विमुक्त जातीतील मागास वर्गाला सरकारी सुविधांचा लाभ मिळवून देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणणे हा आहे.

भटके- विमुक्त विकास परिषदेने या जातीतील नागरिकांचे नुकतेच नमुना सर्वेक्षण केले. त्यात नाशिक जिल्ह्यातील ४ तालुक्यातील ११ गावात सर्वेक्षण झाले. त्यात समाजातील एकूण २ हजार २१७ नागरिकांची सर्वेक्षणात नमुना चाचणीसाठी निवड केली गेली. त्यातील ३६८ नागरिकांकडे आधार, ४८१ जणांकडे साधे मतदान ओळखपत्रेही नाहीत. ९१५ नागरिक रेशन कार्डाविना आहेत. १८ दिव्यांगाकडे दिव्यांग दाखला नाही. ५५२ नागरिकांकडे जन्माचा दाखला नाही. १३८ वृद्धांकडे वृद्धावस्था पेंशन नाही तर १ हजार ७२३ नागरिकांकडे जात प्रमाणपत्र नसल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. राज्यातील एकुण लोकसंख्येच्या ११ टक्के भटके- विमुक्त जातीतील नागरिक आहेत. या सर्वेक्षणाची राज्य सरकारने दखल घेऊन या घटकातील नागरिकांना महत्वाची कागदपत्रे देण्यासाठी २०२ शिबिरे घेतली आणि त्यानंतर राज्यपातळीवर ३ हजार २८० नागरिकांना विविध शासकीय प्रमाणपत्रे देण्यात आली.

Nashik Latest News

भटके- विमुक्त जाती दिन शासकीय पातळीवर साजरा व्हावा ही अनेक वर्षांपासून मागणी हाती. ती मान्य झाली. यामुळे या व्हीजीएनटींना सन्मान मिळणार आहे. राज्यात भटक्या- विमुक्तांच्या ५२ जाती आहेत. व्हीजेमध्ये १४ आणि एनटी-बी मध्ये ३६ जाती आहेत. या समाजाला सर्व सरकारी कागदपत्रे मिळावीत यासाठी एक अध्यादेश जाहीर झाला आहे.
उद्धव काळे, अध्यक्ष, भटके- विमुक्त विकास प्रतिष्ठान व परिषद महाराष्ट्र प्रदेश.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT