नाशिक

Bharat Jodo Nyay Yatra | आचारसंहितेपूर्वीच आटोपणार ‘भारत जोडो न्याय यात्रा’

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

काँग्रेसचे ‌खासदार राहुल गांधी यांच्या दुसऱ्या टप्प्यातील मणिपूर ते मुंबई अशा पूर्व-पश्चिम 'भारत जोडो न्याय यात्रे'ला १४ जानेवारीपासून प्रारंभ झाला आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीची मार्चच्या सुरुवातीस आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे २० मार्चऐवजी ८ ते १४ मार्चदरम्यान खा. गांधी यांची ही यात्रा आटोपण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जनआंदोलन म्हणून कॉंग्रेसतर्फे पहिल्या टप्प्यात कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीर असा तीन हजार ५७० किमी लांबीच्या पायी भारत जोडो यात्रेचे आयोजन ७ सप्टेंबर २०२२ ते ३० जानेवारी २०२३ या कालावधीत झाले. यात्रेदरम्यान खा. गांधी यांनी विविध स्तरांतील नागरिकांशी संवाद साधत त्यांना काँग्रेसची विचारधारा सांगण्याचा प्रयत्न केला. या यात्रेस मिळालेल्या प्रतिसादानंतर कॉंग्रेसतर्फे दुसऱ्या टप्प्यात मणिपूर ते मुंबई अशा सहा हजार ७१५ किमी लांबीची 'भारत जोडो न्याय यात्रा' काढण्यात आली आले आहे. लोकसभा आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीपासूनच ही यात्रा खा. गांधी हे पायी चालण्याऐवजी वाहनाने पूर्ण करण्यावर भर देत आहेत. सद्यस्थितीत नियोजित वेळापत्रकानुसार यात्रेतून दररोज ६० ते ७० किमी अंतर कापले जात होते. मात्र, त्याचा वेग वाढवत दररोज १०० ते १२० किमी अंतर कापण्यावर भर दिला जात आहे. तसेच उत्तर प्रदेशमधील काही मतदारसंघही यात्रेतून वगळले असून, तेथील वेळही घटवण्यात आला आहे. ही यात्रा अखेरच्या टप्प्यात १५ ते १९ मार्चदरम्यान नाशिक जिल्ह्यातील मालेगाव व नाशिक येथून मुंबईकडे मार्गस्थ होणार होती. मात्र, आता वेळापत्रकात बदल केल्याने ५ ते १२ मार्चदरम्यान नाशिकमधून मुंबईच्या दिशेने जाणार असल्याचे समजते. या यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष नाशिक जिल्ह्यातील तीन लोकसभा व आठ विधानसभा मतदारसंघांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे.

यात्रा ७ ते ८ दिवस लवकर होण्याची शक्यता आहे. अद्याप यात्रेचे वेळेपत्रक निश्चित आलेले नाही. लोणावळा येथे शुक्रवारी-शनिवारी (दि.१६-१७) यासंदर्भात बैठक होणार असून, त्यानंतर पुढील निर्णय होईल. – डॉ. तुषार शेवाळे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.

वातावरण निर्मितीसाठी प्रयत्न
यात्रेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये काँग्रेससाठी सकारात्मक वातावरण तयार करण्यासाठी शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. कमिटीत झालेल्या बैठकीत शहराध्यक्ष ॲड. आकाश छाजेड यांच्यासह माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, पदाधिकारी वत्सला खैरे, बबलू खैरे, स्वाती जाधव आदी पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करीत शहरात चौकसभा घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच बूथ कमिटी, इतर शाखांच्या माध्यमातून जनजागृती करण्याचाही निर्णय झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT