देवळाली कॅम्प (नाशिक) : भगूर- देवळाली मार्गावरील रेस्ट कॅम्प रोड येथील प्रसिद्ध रेणुकामाता यात्रेसाठी लष्करी हद्दीतून रस्ता खुला करण्यासाठी बोर्डाचे नामनिर्देशित सदस्य सचिन ठाकरे यांनी केेलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. यात्रा काळात लष्करी हद्दीतून रस्ता खुला करण्यास लष्करी अधिकार्यांनी संमती दिल्याने वाहतूक कोंडी टळणार आहे.
रेणुकादेवीचा यात्रा रेस्ट कॅम्प रोडलगत भरते. या मार्गावरून सिन्नर व इगतपुरी तालुक्यांतील वाहने येतात. यात्रेत वाहतुकीचा खोळंबा होऊ नये, यासाठी लष्करी हद्दीत रस्ता खुला करण्यात आला आहे.सचिन ठाकरे, नामनिर्देशित सदस्य
नवरात्रोत्सवात रेणुकामाता यात्रेला 10 दिवस हजारो भाविक हजेरी लावतात. याच मार्गावरून सिन्नर व इगतपुरी तालुक्यांतील 58 गावांची वाहतूक सुरू असते. यात्रा काळात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी कॅन्टोन्मेंट प्रशासनाने नियोजन केले आहे. लष्करी हद्दीतून 10 दिवसांसाठी रस्ता खुला करण्यासाठी नामनिर्देशित सदस्य सचिन ठाकरे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मनी त्रिपाठी यांनी ब्रिगेडिअर एन. आर. पांडे तसेच शहर वाहतूक शाखेचे अधिकारी देवळाली कॅम्पचे पोलिस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांच्याशी चर्चा केली. लष्करी हद्दीतील मार्ग खुला झाल्याने पंचक्रोशीतील गावांतील वाहतूक सुरळीत राहणार आहे.