नेट बुलिंग 'ब्ल्यू टेररिझम' file photo
नाशिक

सावधान! तरुणाईमध्ये वाढत आहे 'ब्ल्यू टेररिझम'ची विकृती

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : नि ल कुलकर्णी

समाज माध्यामे, वेबसाइट, ॲप आदी डिजिटल माध्यमांतून एखाद्याला मानसिकरीत्या विकृतपणे त्रास देण्याच्या 'ब्ल्यू टेररिझम' या विकृतीने १६ ते ३० वयोगटातील तरुणाईला ग्रासले आहे. त्यामुळे युवा पिढीमध्ये अनेक सामाजिक तसेच मानसिक समस्या निर्माण होत आहेत. (The 'blue terrorism' has affected the youth between the ages of 16 and 30)

नेट बुलिंग (इंटरनेटद्वारे केली जाणारी गुंडगिरी) द्वारे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील खासगी, गुप्त माहिती समाजासमोर आणत तिला मानसिक, शारीरिक अथवा शाब्दिक त्रास देण्याचे प्रकार समाज माध्यमांच्या माध्यमातून केले जात आहेत. धक्कादायक बाब म्हणजे १४ ते २२ वर्षे वयोगटातील मुलेच इतरांना या माध्यमातून त्रास देत आहेत. ऑनलाइन विक्री साइटवर एखाद्या व्यक्तीच्या वस्तूबद्दल खोटी माहिती टाकून त्यांचा नंबर दिला जातो. संबंधितांचे फोन दिलेल्या व्यक्तीच्या फोनवर दिवस- रात्र फोन येत राहतात. अशा प्रकारच्या त्रास देण्याच्या गुन्ह्यातही लक्षणीय वाढ झाली आहे.

'ब्ल्यू टेररिझम' प्रकारात ई-मेल, सोशल साइट्स, ॲप अथवा खासगी साइटचा पासवर्ड 'हॅक' करून एखाद्याची वैयक्तिक माहिती अत्यंत विकृत स्वरूपात सोशल माध्यमातून पसरवली जाते. मुलींबाबत शारीरिक बाबी जसे लठ्ठपणा, रंग, कोड, बुटकेपणा यांवर अत्यंत अश्लाघ्य भाषेत मजकूर लिहून त्याचा सर्वत्र प्रसार केला जातो. इतकेच नव्हे, तर मित्र-मैत्रिणींच्या मोबाइल कॅमऱ्यातून चित्रीकरण केलेल्या चित्रफिती यू-ट्यूबवर टाकण्याचे प्रकारही वाढले आहेत. सोशल माध्यमांच्या साइटवर खोटे अकाउंट तयार करून त्यावर किळसवाणी माहिती, अश्लील फोटो टाकण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. पोलिस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या सायबर सेलद्वारे अशा गुन्ह्याचा छडा माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये लावला जातो. मात्र अशा गुन्ह्यांच्या तक्रारीची तुलनेने अत्यंत कमी आहे.

काय आहे 'ब्ल्यू टेररिझम'?

'ब्ल्यू टेररिझम' ही सायबर विश्वाशी संबंधित संकल्पना आहे. मानसिक त्रास देण्याच्या हेतूने एखाद्या व्यक्तीची खासगी, गोपनीय माहिती हॅक करून इंटरनेटवरून तिचा अत्यंत अश्लाघ्य रूपात प्रसार करणे हे होय. यामध्ये व्यक्तीचे शारीरिक व्यंगत्व, कमतरता, रंग, विवाहपूर्व तसेच बाह्य संबंध, सेक्श्युअल ओरिएंटेशन (एलजीबीटी) इत्यादी माहिती समाजामध्ये प्रसारित करणे. शिव्या, अश्लील संदेश, ब्लॉग, फोरम डिस्कशन बोर्ड अथवा गेस्टबुक पाठवून त्रास देणे होय.

सायबर संस्कार गरजेचा... आपले खासगी जीवन किती प्रमाणात सार्वजिनक करावे याला मर्यादा हवी. तुमची खासगी माहिती सोशल मीडिया तसेच डीप वेब, डार्क वेब वर अपलोड झाली, तरी सायबर फोरेन्सिक तज्ज्ञ, सायबर सेल तसेच संबंधित प्लॅटफॉर्मच्या मदतीने मिटवता येऊ शकते. सायबरसंदर्भात त्रास दिला जात असेल, तर 'आयटी ॲक्ट२०००' अंतर्गत गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करता येते. सायबर सुसंस्कारासह प्रत्येकानेच सायबर सुजाण हाेणे काळाची गरज आहे.
तन्मय दीक्षित, सायबर फॉरेन्सिक तज्ज्ञ, नाशिक.
नैसर्गिक ऊर्मीला विधायक दिशा देणे गरजेचे आहे. पौगंडावस्थेतील मुलांना समज आलेली नसते. पालकांनी सोशल नेटवर्किंगचे धोके, परिणाम मुलांना व्यवस्थित समजावले, तर ते अशा गोष्टींपासून सावध राहतील. मैदानी खेळ, वाचन आणि संस्कार इंटरनेट आणि मोबाइल संस्कृतीमुळे लोप पावताहेत की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या सर्वांचे मूळ त्यातच आहे. त्यांच्या नैसर्गिक ऊर्मीला विधायक माध्यमातून बाहेर पडण्यास वाट मोकळी करून दिली, तर ते अशा विकृतीकडे वळणार नाहीत.
महेश भिरूड, मानसोपचार तज्ज्ञ, नाशिक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT