नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावी प्रमाणपत्र परीक्षेला मंगळवार (दि. ११) पासून प्रारंंभ होत आहे. जिल्ह्यात १२५ केंद्रांवर परीक्षा घेतल्या जाणार असून ७८ हजार १२३ विद्यार्थी प्रविष्ठ आहेत. सर्वाधिक म्हणजे ४० हजार ५२८ परीक्षार्थी विज्ञान शाखेतील आहेत.
कला शाखेसाठी २४ हजार १७९ तर वाणिज्य शाखेचे ११ हजार ८१५ परीक्षार्थी आहे. किमान कौशल्यावर आधारीत अभ्यासक्रमासाठी १ हजार ५१२ परीक्षार्थी असून तंत्रविज्ञान शाखेतील ८९ परीक्षार्थी आहेत. १८ मार्चपर्यंत सुरू राहणाऱ्या या परीक्षांसाठी चोख व्यवस्था आणि पोलिसांचा बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. मंडळाच्या नियमानुसार सर्व विद्यार्थ्यांनी नियोजित वेळेच्या अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
परीक्षार्थींनी परीक्षेसाठी येताना कॉलेजचे ओळखपत्र व प्रवेशपत्र बाळगणे अत्यावश्यक आहे. परीक्षा दरम्यान येणाऱ्या अडीअडचणींसाठी मदत म्हणून विभागीय मंडळातील कार्यकक्षेतील शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, विद्यार्थी पालक यांच्यासाठी विभागीय मंडळाची मदतवाहिनी परीक्षा कालावधीत सकाळी ८ ते रात्री८ या वेळेत कार्यरत राहणार आहे.
विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्याव्यात यासाठी जिल्हानिहाय समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिक मंडळासाठी किरण बावा आणि अरुण जायभावे यांची नियुक्ती झाली आहे.