नाशिक : नाशिकचे तापमान गत दोन दिवसांपासून चाळीशीच्या पार गेल्याने आज मंगळवार (दि.8) आणि उद्या बुधवार (दि.9) नाशिकला उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. भूसावळला उच्चांकी ४३.३ अंश तापमानाची नोंद झाली आहे.
शहराचे कालचे किमान तापमान 19.8 अंश तर कमाल तापमान 40.3 अंश नोंदविले गेले. एप्रिल उजाडताच तापमानाचा पारा चाळीशीच्या पार गेल्याने शहरातील बाजारपेठा रस्त्यांवर शुकशुकाट दिसत आहे. नागरिकांनी वाढत्या उष्णतेपासून सावध राहण्याच्या सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत. एप्रिल उजाडताच राज्यातील कमाल तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. पार्याने चाळीशी पार केल्याने मे महिन्यातील उन्हाच्या स्थितीचा विचार करुन नाशिककरांच्या अंगावर काटा येत आहे. दिवसेंदिवस उष्णता वाढत असल्याने घामाच्या धारांनी नाशिककरांना असह्य केले आहे. नाशिकसह राज्यातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, जळगाव, धुळे, अकोला, चंद्रपुर, गडचिरोली, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
विशेषत : सकाळी 11 ते दुपारी 4 दरम्यान पारा चाळीशी ओलांडत आहे. वाढत्या उष्णतेममुळे आरोग्यावर दुष्परिणाम होऊन डिहायड्रेशन, उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता आहे. यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी दुपारी घराबाहेर पडू नये, शीतपेयांचा वापर करावा, विशेषत: लिंबू पाणी घ्यावे, बर्फाचे पदार्थ घेणे टाळावे, ताक, लस्सी यांचे सेवन करावे आदी सूचना महापलिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
तापमान चाळीशी पार गेल्याने उष्णतेचा असह्य त्रास जाणवत असल्याने दुपारच्या सत्रात रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत आहे. शहरातील मेनरोड, रविवार कारंजा, भद्रकाली, पंचवटी कारंजा, एमजी रोड येथील बाजारपेठही ओस पडल्याचे चित्र दिसत आहे. रस्त्यांच्या कॉर्नवरील शीतपेयांच्या गाड्यांवर गर्दी दिसत आहे.
जळगाव : जळगाव जिल्ह्याचे तापमान मे महिन्यात सर्वाधिक जास्त राहण्याचा उच्चांक आहे. मात्र एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच जळगावचे तापमान 42 अंशावर गेले आहे, तर भुसावळला पारा ४३.३ अंश आणि धरण परिसरात तापमान 45 अंशावर झेपावले आहे. दुपारच्या वेळेस रस्ते ओस पडत आहे. जळगाव जिल्ह्यात उन्हाचा उच्चांक मे महिन्यात गाठला जातो. मात्र यावेळेस 5 एप्रिलला 42.5 अंशावर पारा पोहचला आहे. भुसावळला 43.3 अंश तापमानाची नोंद झाली आहे. हातनूर परिसरात 1 तारखेला 39 अंश , 2 व 3 तारखेला 37 अंश, 4 व 5 तारखेला ४० अंश तर 5 तारखेला 43 अंश आणि 6 तारखेला 45 अंश नोंद झालेली आहे.