नाशिक : शहरात सध्या ऑक्टोबर हीटमुळे उकाडा वाढला आहे. त्यातच ढगाळ वातावरण असून, अधूनमधून पावसाच्या सरीही बरसत आहे. या खराब हवामानामुळे गेल्या पंधरा दिवसात नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. विषाणूजन्य संसर्गाच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे. विशेषत: लहान मुलांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाण जास्त दिसून येत आहे. (There has been an increase in patients with viral infections)
लहान मुलांना फ्ल्यू प्रतिबंधक लस द्यावी
आजारी पडल्यानंतर मास्कचा वापर करावा
आजारी असल्यास शाळेत पाठवू नका
बाहेरील खाद्यपदार्थ खाणे शक्यतो टाळा
लक्षणे दिसताच तज्ञ डॉक्टरांकडून उपचार घ्या
शहरातील हवामान हे सध्या खराब असून, ते विषाणू संसर्गास पोषक ठरत आहे. यामुळे फ्ल्यूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सर्दी, ताप, थंडी आणि खोकला ही लक्षणे प्रामुख्याने रुग्णांमध्ये दिसून येत आहेत. याचबरोबर घसा दुखणे आणि अंगदुखी अशी लक्षणेही दिसून येत आहेत.श्वसनमार्गाला संसर्ग आणि खोकल्याचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: दम्याच्या रुग्णांमध्ये हे प्रमाण अधिक आहे.
लहान मुलांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाण अधिक असून, सर्दी, ताप, खोकल्यासोबत अतिसाराची लक्षणे दिसून येत आहेत. मुले आजारी पडल्यास पालकांनी त्यांना शाळेत पाठविणे टाळावे. कारण शाळेत गेल्यानंतर ती इतर मुलांच्या संपर्कात येऊन आजाराचा प्रसार वाढण्याचा धोका असतो. सध्याचे हवामान विषाणू संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरत आहे. यामुळे रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. डेंग्यू आणि चिकुनगुन्याचा संसर्ग कमी होऊ लागला असून, इतर विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे.