देवळा : बँकेत तारण ठेवलेले सोने हे शुद्ध व योग्य वजन असल्याचे सांगत खोटे अहवाल बँकेला वेळोवेळी सादर करण्यात आल्याने देमको बँकेची तब्बल ५४ लाख ७४ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून याबाबत देवळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील दि देवळा मर्चंट्स को ऑपरेटिव्ह बँक लि.च्या देवळा शाखेतील बँकेचे व्हॅल्यूअर राजेंद्र मोतीराम सोनवणे (५०, रा. कापशी ता.देवळा) यांनी कर्जप्रकरण पास करताना बँकेचे खातेदार यांच्या सोने-चांदी तारण ठेवले. यावेळी सोन्याचांदीची शुद्धता प्रामाणिकपणे ठरविणे बंधनकारक असताना सोनवणे यांनी काही खातेदारांची संगनमत करून बँकेचा विश्वासघात केला. सप्टेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत हे प्रकरण घडले.
बँकेच्या तब्बल २७ खातेदारांची संगनमत करून कर्जप्रकरण करताना खातेदारांचे सोने गहाण ठेवतेवेळी सदोष, त्रुटी व तफावत असलेले किंवा बनावट व दुय्यम सोने बँकेत तारण म्हणून ठेवून घेतले. तसेच तारण ठेवण्यात आलेले सोने शुद्ध व योग्य वजन असल्याचा खोटा अहवाल बँकेला सादर केला. या अहवालावरून बँकेने नमूद २७ संशयित आरोपी खातेदारांना ५४ लाख ७४ हजार रु. कर्ज मंजूर केले. या २७ जणांमध्ये कापशी येथील सहा, गुंजाळनगर सहा, देवळा पाच, सुभाषनगर व रामेश्वर प्रत्येकी दोन तर भिलवाड, वाखारवाडी, पिंपळगाव (वा) , सरस्वतीवाडी, वरवंडी येथील प्रत्येकी एका खातेदारांचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे बँकेचे एकूण ५४ लाख ७४ हजार रु. व अधिक येणे व्याज रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा शुक्रवार (दि.५) रोजी दाखल करण्यात आला आहे. प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील हे पुढील तपास करत आहेत.