नाशिक : बकरी ईदनिमित्त दिल्या जाणाऱ्या जनावरांच्या कुर्बानीसाठी महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागातर्फे शहरात चार तात्पुरत्या कत्तलखान्यांना परवानगी देण्यात आली आहे. पशुधन विकास अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेल्या जनावरांचीच कुर्बानी देता येणार असून, राज्यात गोवंश हत्याबंदी लागू असल्यामुळे गोवंशीय जनावरांची कुर्बानी देता येणार नसल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांनी स्पष्ट केले आहे.
मुस्लीम बांधवांची बकरी ईद अर्थात 'ईद उल अज्हा' शनिवारी (दि. ७) साजरी होणार आहे. या पर्वाला जनावरांच्या कुर्बानीचे विशेष महत्त्व आहे. शहरात हजारो कुर्बान्या दिल्या जातात. यासाठी महापालिकेने यंदाही चार ठिकाणी तात्पुरत्या कत्तलखान्यांना सशर्त परवानगी दिली आहे. या ठिकाणांमध्ये नानावली मशिदीजवळ (जुने नाशिक), गौसिया अंजुमन ट्रस्ट (वडाळा गाव), न्यू उम्मीद जनजीवन संस्था (जिनतनगर) आणि के. जी. एन. संस्था (मेहबूबनगर) यांचा समावेश आहे.
राज्यात ४ मार्च २०१५ पासून गोवंश हत्याबंदी कायदा लागू आहे. त्यानुसार वळू व बैल यांच्या कत्तलीस मनाई आहे. त्यामुळे गोवंशीय जनावरांची कुर्बानी देता येणार नाही, असे महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागातर्फे स्पष्ट केले आहे. तात्पुरत्या कत्तलखान्याची उंची किमान आठ फूूट असावी. तिन्ही बाजूस लोखंडी पत्रे, बांबूच्या चटईने जागा बंदिस्त केलेली असावी. प्रत्येक कत्तलखान्यात भरपूर प्रमाणात मोकळी जागा असावी. रेती तसेच पाण्याचा पुरवठा, विद्युत व्यवस्था असावी. कुर्बानीनंतर मांस नेताना संपूर्णपणे झाकून न्यावे, कुणाच्याही भावना दुखावणार नाही, याची काळजी घ्यावी, कुर्बानीचे कामकाज संपल्यावर तेथील जागा निर्जंतुक करावी. कत्तलीसाठी जनावरे अथवा वाद्य अगर मिरवणुकीने आणू नये, असे आवाहन डॉ. सोनवणे यांनी केले आहे.