Bairagi's Social Awareness Campaigns  
नाशिक

Bairagi's Social Awareness Campaigns |देशभरात भारुडाची पताका फडकविणारे बैरागी

साक्षरता मिशन, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, एड्स जनजागृती

पुढारी वृत्तसेवा

नांदगाव : सचिन बैरागी

वारकरी संप्रदायाची परंपरा आणि लोककलेचा समृद्ध वारसा जपणारी भारुड ही महाराष्ट्राची वैशिष्ट्यपूर्ण कला आहे. कीर्तन, गायन, विनोद आणि प्रभावी संवादातून भारुडाला गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचविण्याचे उल्लेखनीय कार्य ह.भ.प. 'भारुड सम्म्राट' भानुदास महाराज बैरागी यांनी केले.

भानुदास महाराज मूळचे नांदगाव तालुक्यातील सोयगाव येथील रहिवासी आहेत. त्यांचे बालपण वारकरी संस्कार आणि संतपरंपरेच्या वातावरणात गेले. पुढे वडील व्यवसायानिमित्त कोपरगाव येथे स्थायिक झाल्याने सध्या त्यांचे वास्तव्य कोपरगाव येथे आहे. सुरुवातीच्या काळात काही सवंगड्यांसोबत गावोगावी भारुड सादर करताना त्यांच्या दमदार आवाजाने, भक्तिपूर्ण गायनाने आणि प्रभावी अभिनयाने रसिकांची मने जिंकली. त्यांच्या कलेला मिळालेल्या लोकप्रियतेमुळे भारुड आणि भजनांच्या ऑडिओ कॅसेट्स प्रसिद्ध झाल्या. पुढे दूरदर्शन, आकाशवाणी आणि विविध नामांकित वाहिन्यांवर त्यांच्या कार्यक्रमांचे प्रसारण झाले. त्यामुळे त्यांच्या भारुड कलेचा लौकिक महाराष्ट्रासह देशभर पोहोचला.

भानुदास महाराजांनी भारुडाला केवळ मनोरंजनाचे माध्यम न मानता समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन बनविले. साक्षरता मिशन, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, एड्स जनजागृती यांसारख्या उपक्रमांत त्यांनी भारुडातून जनजागृती केली. हसवत-हसवत गंभीर सामाजिक विषय लोकांपर्यंत पोहोचविण्याची त्यांची हातोटी विशेष उल्लेखनीय आहे.

भारुडातून वारकरी परंपरा, संतविचार आणि नैतिक मूल्ये नव्या पिढीपर्यंत पोहोचविणारे भानुदास महाराज हे कलाकारासोबतच प्रबोधनकार आणि समाजसेवक आहेत. त्यांच्या कार्यामुळे 'भारुड सम्राट' ही उपाधी सार्थ ठरते.

नोकरीसोबत कलेची निष्ठेने सेवा

कलेची साधना करत असतानाच भानुदास महाराजांनी आपल्या व्यावसायिक जबाबदाऱ्यांकडेही तितक्याच गांभीर्याने पाहिले. आज ते जिल्हा बँकेत शाखा व्यवस्थापक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. नोकरीच्या व्यापातून वेळ काढून भारुड कलेची सेवा करणे, ही त्यांच्या कलेवरील निष्ठेचीच प्रचिती आहे. व्यवसायाने बँक अधिकारी आणि मनाने कलाकार असलेल्या भानुदास महाराजांनी आपल्या जीवनात नोकरी आणि कलेचा सुंदर समतोल साधला आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात कर्तव्यनिष्ठ अधिकारी, संवेदनशील कलाकार आणि समाजप्रबोधनाची तळमळ असलेला वारकरी, असा त्रिवेणी संगम पाहायला मिळतो.

नव्या पिढीपर्यंत संतविचार पोहोचविण्याचे कार्य

आजच्या डिजिटल युगात पारंपरिक लोककलांसमोर अनेक आव्हाने उभी आहेत. अशा काळात भारुडासारख्या लोककलेला जिवंत ठेवण्याबरोबरच नव्या पिढीपर्यंत संतांचे विचार, वारकरी संप्रदायाची शिकवण, सामाजिक बांधिलकी आणि नैतिक मूल्ये पोहोचविण्याचे कार्य भानुदास महाराज सातत्याने करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT