बाजारपेठेत खरेदीसाठी नाशिककरांची गर्दी  (छाया -हेमंत घोरपडे)
नाशिक

आज बैलपोळा : शेतकऱ्यांमध्ये उत्साह

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : लोकसंस्कृतीचा वारसा असलेल्या बैलपोळ्याचा सण सोमवारी (दि. २) साजरा होणार आहे. तसेच लाडक्या गणरायाचे येत्या शनिवारी (दि. ७) आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर नाशिककरांनी सुटीचा मुहूर्त साधत बैलपोळा आणि लाडक्या बाप्पाच्या सजावटीचे साहित्य घेण्यासाठी बाजारपेठेत गर्दी केली. यावेळी सहकुटुंब नागरिकांनी खरेदीचा आनंद लुटला. बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले आहे.

आज बैल-पोळा : शेतकऱ्यांमध्ये उत्साह

वर्षभर शेतात राबणाऱ्या सर्जा-राजाबद्दल ऋण व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे बैलपोळा सण सोमवारी (दि. २) साजरा केला जाणार आहे. या सणाच्या अनुषंगाने आवश्यक साहित्याची बाजारपेठ आठवडाभरापासून सजली आहे. बाजार समितीत माल खरेदी-विक्री केल्यानंतर सणाचे साहित्य खरेदीला प्राधान्य दिले.

यंदा चांगले पर्जन्यमान राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद आहे. त्यामुळे बैलपाेळ्याचा सण उत्साहात साजरा करण्याची तयारी करण्यात आली आहे. बैलांसाठी लागणारे वेसण, घुंगरमाळा, पैंजण, म्होरकी, घाटी, झूल व गोंडे असे विविध प्रकारचे साहित्य शेतकऱ्यांनी खरेदी केले. तसेच बैलांप्रति ऋण व्यक्त करण्यासाठी घरोघरीदेखील मातीच्या बैलांचे पूजन केले जाते. बाजारात पारंपरिक मातीच्या बैलांसह प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे विविध आकारांतील व रंगसंगती असलेले बैलदेखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ते खरेदी करण्यासाठी शहरवासीयांची झुंबड उडाली. त्यातून छोट्या-माेठ्या विक्रेत्यांना आर्थिक हातभार लागला आहे.

महागाई तरीही उत्साह

बैलपोळानिमित्ताने बैलांच्या सजावटीसाठी बाजारात दाखल झालेल्या विविध वस्तूंच्या दरात गतवर्षीच्या तुलनेत सुमारे २० ते ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र, यंदा पावसाने चांगली बॅटिंग केली आहे. त्यामुळे शेतातील पिकदेखील जोमात येणार आहेत. त्यामुळे बळीराजा सुखावला असून, त्याने लाडक्या बैलांच्या सजावटीसाठी सढळ हाताने खरेदी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT