जळगाव :
मध्य प्रदेशातील ब-हाणपुर येथे रिक्षामधील प्रवाशांचे खिसे कापून चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यांना अखेर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) गजाआड केले आहे. या दोघांना जळगावमधून अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली असून, पुढील चौकशीसाठी त्यांना ब-हाणपुर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ब-हाणपुर (मध्य प्रदेश) येथील कोतवाली पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या टोळीने प्रवाशांना रिक्षात बसवून त्यांच्या खिशातील रोकड आणि मौल्यवान वस्तू कापून पळविण्याचा प्रकार वारंवार केला होता. या गुन्ह्यांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
दरम्यान, तपासादरम्यान पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली की हा गुन्हा जळगाव येथील रेकॉर्डवरील अट्टल चोरटे वसीम कय्युम खाटीक (वय ३३, रा. मास्टर कॉलनी, जळगाव) आणि तौसीफ सत्तार खान (वय ३६, रा. रामनगर, जळगाव) यांनी त्यांच्या साथीदारांसह केला आहे. ही माहिती मिळताच, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी तत्काळ विशेष पथक तयार केले.
या पथकाने नियोजनपूर्वक छापा टाकून दोघा आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा देखील जप्त केली. अटक केलेले दोन्ही आरोपी आता ब-हाणपुर (म.प्र.) कोतवाली पोलिसांच्या ताब्यात असून, त्यांच्यावर पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक चौकशीत दोघांनीही खिशे कापून चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
या कारवाईचे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वरी रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी केले.
कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, अंमलदार अतुल वंजारी, अकरम शेख, विजय पाटील, नितीन बाविस्कर, प्रविण भालेराव, किशोर पाटील, रविंद्र कापडणे, राहुल रगडे, नाना तायडे, आणि महेश सोमवंशी यांनी विशेष भूमिका बजावली.
या यशस्वी कारवाईमुळे जळगाव पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या दक्षतेचं आणि जलद तपास कौशल्याचं प्रदर्शन केलं आहे. ब-हाणपुर व जळगाव परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या या तातडीच्या कारवाईचे कौतुक केले आहे.