nylon manja injury
सिन्नर (नाशिक) : नायलॉन मांजामुळे एक तरुण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना संगमनेर नाक्यावर शनिवारी (दि.29) रोजी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास घडली आहे.
वैभव काळे (२९), रा. कानडी मळा, हे दुचाकीवरून जात असताना उंचावर अडकलेल्या नायलॉन मांजामुळे त्यांचा गळा, कान आणि भुवईवर खोल जखमा झाल्या आहेत.
वैभव काळे यांना तातडीने जवळील परमसाई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी तत्काळ शस्त्रक्रिया करून 70 ते 80 टाके घातले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.
जीवघेणे दाहक उदाहरण
नायलॉन मांजाचा वाढता वापर दरवर्षी अनेकांना जीवघेणे ठरत असून ही घटना पुन्हा एकदा त्याचे दाहक उदाहरण ठरली आहे. या घटनेनंतर सिन्नर परिसरात नायलॉन मांजाविरोधात कारवाईची मागणी जोर धरत असून प्रशासनाने तत्काळ पावले उचलावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.