नाशिक : बेशिस्त रिक्षाचालकांना वठणीवर आणण्यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वात 'ऑटो रिक्षा शिस्त मोहिम' हाती घेतली असून, बेशिस्त ऑटोरिक्षा चालकांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस आयुक्त कर्णिक यांनी वाहतूक शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.
या मोहिमेअंतर्गत रिक्षा चालकांने त्याचे नाव, परवाना धारकाचे नाव, परवाना क्रमांक, बॅच, चालकाचा लायसन्स क्रमांक आदीबाबतची माहिती प्रवाशांना दिसेल अशा दर्शनी भागात लावणे बंधनकारक असणार आहे. रिक्षाचालकाने निर्धारित गणवेश परिधान करणे, तसेच गणवेशावर आरटीओद्वारे दिलेले बॅच स्पष्टपणे परिधान करणे, परवाना संपलेल्या व तांत्रिकदृष्ट्या अयोग्य किंवा धोकादायक रिक्षा चालवताना मिळून आल्यास रिक्षाचे निलंबन करणे, धोकादायकरित्या व वेगवान स्वरुपात रिक्षा चालविताना मिळून आल्यास तत्काळ कारवाई करणे आदी सूचना देण्यात आल्या आहेत.
या ठिकाणी राबविणार मोहिम
शनिवारपासून (दि.२५) शहरातील गंगापूर रोड, कॉलेज रोड, मुंबई नाका, त्र्यंबक नाका, रविवार कारंजा, अशोकस्तंभ, शालिमार, सीबीएस, सीटी सेंटर मॉल, आनंदवली, सारडा सर्कल, राजदूत हॉटेल, कॅनडा काॅर्नर व बाजारपेठ, मालेगाव स्टॅण्ड, दिंडाेरी नाका, पंचवटी कारंजा, पेठ फाटा, मखमलाबाद नाका, रामकुंड, संतोष टी पॉईंट, छत्रपती संभाजी नगर नाका, नांदुर नाका, जत्र हॉटेल, अमृत धाम, जेलरोड, बिटको सर्कल, शिवाजी पुतळा, रेल्वे स्टेशन, सुभाषरोड, मुक्तीधामसमोर, उपनगर नाका, दत्तमंदिर सिग्नल, बिटको कॉलेज समोर, द्वारका सर्कल, त्रिमुर्ती चौक, पाथर्डी फाटा, सातपूर, श्रमिकनगर, बारदान फाटा, पपया नर्सरी, एक्स्लो पॉइल, फाळके स्मारक, गरवारे, लेखानगर, इंदिरानगर, भगूर, देवळाली गाव व कॅम्प, संसरी नाका आदी ठिकाणी ही मोहिम राबविण्यात येणार आहे.
संयुक्त मोहिम
प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यासोबत वाहतुक नियंत्रण व तपासणी पथके नियुक्त करून संयुक्तरित्या कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वाहतुक शाखेच्या पोलिस उपायुक्त किरिथिका सी. एम. यांनी दिली आहे.