विधानसभा  Maharashtra Legislative Assembly
नाशिक

Assembly Elections | शिंदे गटाकडून ४६ निवडणूक प्रभारी, ९३ विधानसभा निरीक्षक जाहीर

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिंदे गटातर्फे ११३ विधानसभा मतदारसंघांकरिता ४६ निवडणूक प्रभारी आणि ९३ विधानसभा निरीक्षकांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी ही माहिती दिली आहे.

विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. येत्या सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या निवडणुकांची आदर्श आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. निवडणूक तयारीचाच भाग म्हणून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार गेल्या आठवड्यात नाशिक जिल्हा दौऱ्यावर आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदार असलेल्या निफाड तालुक्यात त्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. राज्याचे विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल यांच्या वाढदिवसानिमित्त हजेरी लावली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पक्षाचे नेते रवींद्र मिर्लेकर यांनी देवळाली पूर्व, पश्चिम व मध्य विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. भारतीय जनता पक्षाच्या वतीने शनिवारी (दि. 27) भाजपचे नाशिक जिल्हा प्रभारी व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली, तर रविवारी (दि. 28) अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे नाशिकच्या दोनदिवसीय दौऱ्यावर आहेत. शिवसेनेच्या शिंदे गटानेदेखील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ११३ विधानसभा मतदारसंघांतील निवडणूक प्रभारी आणि विधानसभा निरीक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

अशा झाल्या नियुक्त्या...

निवडणूक प्रभारी- गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण, चोपडा, मुक्ताईनगर), दादा भुसे (साक्री, पाचोरा, मालेगाव बाह्य), हेमंत गोडसे (देवळाली, इगतपुरी), सुहास कांदे (नांदगाव, दिंडोरी, निफाड, चांदवड-देवळा). विधानसभा निरीक्षक- किशोर दराडे (साक्री, चोपडा), प्रसाद ढोमसे (अक्कलकुवा), जेरी डेविड (नेवासा), राजू वाघमारे (श्रीरामपूर), विजय करंजकर (देवळाली), किरण लांडगे (इगतपुरी), फरहान खान (नांदगाव), धनराज महाले (दिंडोरी), अजय बोरस्ते (निफाड), सुनील पाटील (चांदवड-देवळा).

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT