विधानसभा 2024 pudhari news network
नाशिक

विधानसभा 2024 | मराठा- ओबीसी राजकारणात 'बाहुबलीं'चा कस !

पुढारी वृत्तसेवा
येवला : अविनाश पाटील

अवघ्या राज्याचे लक्ष लागणाऱ्या आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या येवला-लासलगाव मतदारसंघात भुजबळांनी चौकार विजय प्राप्त करत स्वत:ला सिद्ध केले आहे. यंदा पुन्हा त्यांनी जोमाने तयारी सुरू केली आहे. वीस वर्षांपासून येथे भुजबळांची मजबूत पकड आहे. प्रत्येक निवडणुकीत भुजबळांना तालुक्यातील अनेक प्रमुख नेत्यांचे सहाय्य लाभल्याचे आजवर आधोरेखित झाले आहे. यातूनच त्यांचा विजय सुकर होतो. यंदा मात्र मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांच्यासोबत घेतलेला पंगा यामुळे 'बाहुबलीं'ना निवडणूक नक्कीच सोपी राहिलेली नाही.

मागील निवडणुकीत मतदान

छगन भुजबळ (राष्ट्रवादी कॉंग्रस) : 1,26,237

संभाजी पवार (शिवसेना) : 69,712

सध्या राज्यात वेगवेगळे मुद्दे पेटलेले असताना भुजबळ यांनी आपल्या मतदारसंघातील कामांवर 'फोकस' केले आहे. विशेषत: ज्या पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पाटपाण्याचे आश्वासन देऊन आमदारकी मिळविली त्या मांजरपाडा (देवसाने) पुणेगावचे पाणी तालुक्याच्या उत्तर पूर्व भागात आणण्याचे काम त्यांनी नुकतेच पूर्ण केले. त्यातही यंदा पर्जन्यमान चांगले असल्याने देवसाने प्रकल्पाचे पाणी पुणेगाव-दरसवाडीमार्ग नगरसूलपर्यंत पोहोचले आहे. या पाण्यामुळे तालुक्याच्या उत्तर पूर्व भागात अक्षरश: दिवाळी साजरी झाल्याने त्यामुळे मराठा समाजाचा भुजबळांना असलेला कथित विरोध वाहून जातो की काय, अशी परिस्थितीही निर्माण झाली आहे.

राष्ट्रवादीतील फुटीनंतर भुजबळ यांनी अजित पवार गटात, तर पूर्वीचे त्यांचे समर्थक आणि गेल्या काही वर्षांपासूनचे विरोधक राहिलेले माणिकराव शिंदे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. दुसरीकडे शिवसेना फुटीचा येवला भागात अधिक फारसा प्रभाव दिसत नाही. येथे शिंदे गटाचे अस्तित्व केवळ दिसण्यापुरते आहे. त्यात ठाकरे गटाचे ग्रामीण जिल्हाप्रमुख विधान परिषद सदस्य नरेंद्र दराडे यांचे सुपुत्र कुणाल दराडे यांनी विविध उपक्रम हाती घेत जनसंपर्क वाढविला आहे. त्यामुळे दराडे यांचेदेखील भुजबळांना मोठे आव्हान असणार आहे. याबरोबरच यापूर्वी दोनवेळा निवडणूक उढविलेले उबाठा गटाचे संभाजी पवार देखील मैदानात उतरू शकतात. निफाड तालुक्यातील जिल्हा परिषदेचे देवगाव आणि लासलगाव गट याच मतदारसंघात येतात. देवगाव गटाच्या जि. प. सदस्या अमृता पवार भाजपकडून तयारी करीत आहेत. असे असले तरी तालुक्यात भाजपचे बळ अतिशय नगण्य आहे.

अपूर्ण आश्वासने विरोधकांचे भांडवल

मंत्री भुजबळ यांनी दहावर्षांपासून उभारलेले पैठणी क्लस्टर जवळजवळ बंद अवस्थेत आहे. पाच ते सात वर्षे होऊनही चिचोंडी एमआयडीसीत एकही उद्योग सुरू झालेला नाही. या शिवाय भुजबळांनी दिलेली मात्र पूर्ण न करता आलेली आश्वासने विरोधकांसाठी निवडणुकीत भांडवल ठरणार आहेत.

मराठा फॅक्टर किती प्रभावी?

मतदारसंघात मराठा बहुसंख्य असले तरी येथे थेट जातियवाद कधीही दिसून आलेला नाही. याचे उदाहरण म्हणजे मागील सर्व निवडणुकांचा इतिहास पाहिला तर वंजारी समाजाचे जनार्दन पाटील हे दोन वेळा आमदार राहिले आणि 1999 च्या निवडणुकीत नरेंद्र दराडे वंजारी समाजाचे उमेदवार अवघ्या दीड-दोनशे मतांनी पराभूत झाले होते. त्यामुळे भुजबळांना जातीय राजकारणाचा फारसा फटका बसेल, असे दिसत नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT