कळवण : आदिवासी वसतिगृह, आश्रमशाळातील असुविधेविरोधात आदिवासी जेन झी चे नाशिकमध्ये १३ दिवसांपासून, तर राज्यभरात विविध ठिकाणी विद्यार्थ्यांचे आंदोलने सुरू असतानाच कळवण तालुक्यातील विसापूर आठवर्षीय विद्यार्थिनीचा आश्रमशाळेतील उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली. सृष्टी ओंकार सूर्यवंशी असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. आश्रमशाळेत असताना दिवसभर ताप व उलट्यांचा त्रास झाला. मात्र, वेळेत वैद्यकीय उपचार न मिळाल्याचा आरोप विद्यार्थिनीच्या पालकांनी केला आहे. यामुळे आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
सृष्टीला ताप आल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती बिघडल्यानंतर सृष्टीला उपचारासाठी मोकभणगीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. शुक्रवारी (दि. ४) मध्यरात्री साडेबारानंतर तिला पुन्हा उलटी आणि ताप येत प्रकृती खालावली. त्यावेळी सृष्टीला कळवण येथे रुग्णालयात हलवले. पहाटे २.२७ वाजता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर रात्री दीडच्या सुमारास पालकांशी संपर्क साधण्यात आला. या घटनेमुळे विसापूर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांत शोककळा पसरली आहे. मृत विद्यार्थिनीला ताप आल्याने गेल्या दोन दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी विद्यार्थिनीचा मृतदेह तपासणीसाठी नाशिकला पाठवण्यात आला असून, शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
नाशिक:
विसापूर शासकीय आश्रमशाळेतील इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी सृष्टी सूर्यवंशी हिच्या मृत्यूने आंदोलन, उपोषण करत असलेल्या आदिवासी जेन झी मध्ये खळबळ उडाली आहे. निष्पाप सृष्टीने मृत्यूस कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, या मागणीवर ठाम राहत संतप्त पालक आणि आदिवासी आंदोलकांनी जिल्हा रुग्णालयात मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. इतकेच नव्हे, तर मृतदेह थेट आदिवासी आयुक्तालयावरच नेण्याचा आक्रमक पवित्रा घेतला. यामुळे धास्तावलेल्या आदिवासी आयुक्त लीना बनसोड यांनी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे धाव घेत पालकांची समजूत काढली तसेच तातडीने संबंधित आश्रमशाळेतील अधीक्षिकांसह, शिक्षण विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक यांना निलंबित केले. तसेच पीडित कुटुंबाला पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली.
कळवण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत विसापूर आश्रमशाळेतील विद्यार्थिनी सृष्टी सूर्यवंशी हिचा शुक्रवारी (दि. ४) मध्यरात्री मृत्यू झाला. वेळेत उपचार न मिळाल्याने, पालकांना अंधारात ठेवल्याचा आरोप मृत विद्यार्थिनीच्या पालकांनी केला आहे. त्यावेळी शवविच्छेदनासाठी सृष्टीचा मृतदेह नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला.
या घटनेमुळे संतप्त पालकांनी व आदिवासी युवक तसेच आंदोलनकर्त्यांनी रुग्णालयात गर्दी केली. सृष्टीच्या मृत्यूस कारणीभूत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी, ही कारवाई होत नाही, तोवर मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांना नकार दिला. दोषींवर वेळीच कारवाई केली नाही तर आयुक्तालयात तिचा मृतदेह घेऊन जाण्याचा इशारा यावेळी जमलेल्या समुदायाने दिला. त्यामुळे घाबरलेल्या आदिवासी विकास आयुक्त बनसोड यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊनपालकांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. यात पालकांची समजूत काढली. त्यानंतर बनसोड यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यावर, अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांनी शिक्षण विस्तार अधिकारी भगवान वसंत निकम, स्त्री अधीक्षिका स्मिता प्रल्हाद गायकवाड आणि शाळेचे मुख्याध्यापक जिभाऊ पवार यांच्या निलंबित करण्याचे आदेश काढले.
३० विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली
विसापूर शासकीय आश्रमशाळेतील आणखी ३० विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच आमदार नितीन पवार, यांनी परिस्थितीचा आढावा घेत योग्य उपचार मिळावेत यासाठी प्रशासनाला सूचना केल्या. दरम्यान, सहायक जिल्हाधिकारी कश्मिरा संखे यांनीही उपजिल्हा रुग्णालयास भेट देत विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
मुख्याध्यापक, संबंधित वॉर्डन तसेच उपचार प्रक्रियेत कर्तव्यात कसूर झाला असल्यास संबंधित वैद्यकीय कर्मचाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करत दोषींवर कठोर कारवाई करावी, शवविच्छेदन अहवालासोबतच संपूर्ण घटनाक्रमाची स्वतंत्र चौकशी करत वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी.
सृष्टीच्या मृत्यूची कारणे सखोलपणे शोधत आहोत. सेंट्रल किचनची नोंदवही तपासली जाईल. तिला किती प्रमाणात ताप आला, कुठले उपचार झाले व मृत्यूचे नेमके कारण काय हे लवकरच समजेल. विद्यार्थ्याचा मृत्यू कसा टाळता येईल, यासाठी ठोस उपाययोजना करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहोत.
- लीना बनसोड, आयुक्त, आदिवासी विकास विभाग
सृष्टी सूर्यवंशी हिच्या मृत्यूची नेमकी कारणे शोधण्यासाठी आम्ही अन्न व पाण्याची तपासणी केली. तसेच शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पुढील कार्यवाही केली जाईल.
- डॉ. कश्मिरा संख्ये, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास
मुख्याध्यापक, संबंधित वॉर्डन तसेच उपचार प्रक्रियेत कर्तव्यात कसूर झाला असल्यास संबंधित वैद्यकीय कर्मचाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करत दोषींवर कठोर कारवाई करावी, शवविच्छेदन अहवालासोबतच संपूर्ण घटनाक्रमाची स्वतंत्र चौकशी करत वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी
- ओंकार सूर्यवंशी (सृष्टीचे पालक)
३० विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली
विसापूर शासकीय आश्रमशाळेतील आणखी ३० विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच आमदार नितीन पवार, यांनी परिस्थितीचा आढावा घेत योग्य उपचार मिळावेत यासाठी प्रशासनाला सूचना केल्या. दरम्यान, सहायक जिल्हाधिकारी कश्मिरा संखे यांनीही उपजिल्हा रुग्णालयास भेट देत विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.