Ashok Kharat Nashik Pudhari
नाशिक

Ashok Kharat Case : अबब! भोंदू खरातची संपत्ती दोन हजार कोटींच्या घरात

Ashok Kharat Case : सावकारीचा धंदा : तिघांच्या आत्महत्या; नाशिक, अहिल्यानगरमध्ये 52 मालमत्ता

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : श्रद्धेचा खेळ मांडून अनेकांना गंडविणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात याच्या मालमत्तेचे आकडे बघून तपास यंत्रणाही चक्रावून गेल्या आहेत. कालपर्यंत खरातच्या पाचशे कोटींच्या मालमत्तेचे तपशील समोर आले होते. मात्र, आता हा आकडा थेट दीड ते दोन हजार कोटींवर गेल्याने खरातच्या दुष्कृत्यांची आता देशभरात चर्चा रंगत आहे. अटक करण्यात आलेल्या अशोक खरातवर रविवारी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

त्याचबरोबर त्याचा सावकारीचा धंदाही जोरात होता. खरातच्या या सावकारी पाशातून शिर्डीतील तिघांनी आत्महत्या केल्याची चर्चाही पुन्हा एकदा रंगत असून अशोक खरातने हे प्रकरण हातोहात कसे दडपले, हे देखील नव्याने चर्चिले जात आहे.

खरातने नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत तब्बल 52 मालमत्ता घेतल्या असून त्यातील 11 मालमत्तांच्या सातबारावर त्याचे स्वतंत्र नाव आहे. तसेच त्याच्या पत्नीच्या नावेही सर्वाधिक मालमत्तांची नोंद आहे.

खरात प्रकरणात दररोज नवनवे धक्कादायक खुलासे होत असून, त्याने केलेल्या दुष्कृत्यांची जंत्रीच आता समोर येत आहे. श्रद्धेच्या आडून त्याने जमविलेली माया चक्रावून टाकणारी आहे. अनेक जमिनी त्याने बळकावल्या असून सामायिक व्यवहारांमध्येही त्याने अनेकांना गंडविले आहे.

पाथर्डी परिसरात 29 जागा

शहरातील पाथर्डी परिसरात सर्वाधिक 29 जागा खरातच्या नावे आहेत. गिरगाव 8, नाशिक शहर, गौळाणे, शिर्डी, निमगाव याठिकाणी प्रत्येकी एक, सिन्नर 6, कुंदेवाडी 3, आडगाव 2 अशा त्याच्या व त्याच्या कुटुंबीयांच्या नावे मालमत्ता आहेत. दरम्यान, याबाबतचा तपशील तपास यंत्रणांच्या हाती लागला असून त्यादृष्टीने सध्या सखोल तपास सुरू आहे.

ईडीची एंट्री होणार

शंभर कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या गैरव्यवहाराच्या प्रकरणात ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाच्या वतीने चौकशी केली जाते. खरात प्रकरणात तब्बल दीड ते दोन हजार कोटींची बेनामी मालमत्ता समोर आल्याने या प्रकरणात आता ईडीची एंट्री होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्या एसआयटीसह आयकर विभागाकडून या सर्व प्रकरणाची संयुक्तपणे चौकशी केली जात आहे. आता ईडीदेखील या प्रकरणात उडी घेण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT