Ashok Kharat Nashik Pudhari
नाशिक

Ashok Kharat SIT Investigation Nashik | एसआयटीचा 'सीक्रेट' प्लॅन! खरातला नाशिकहून अज्ञातस्थळी हलवले; तपासात प्रचंड गोपनीयता

Ashok Kharat SIT Investigation Nashik | संतापजनक : दुसऱ्या पीडितेचाही केला गर्भपात; आतापर्यंत तीन गुन्हे

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नराधम अशोक खरात याच्या दुष्कर्माची व्याप्ती वाढत असल्याने, राज्य सरकारने आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली एसआयटी स्थापन केली. एसआयटीच्या माध्यमातून या प्रकरणाचा तपास केला जात असताना, रविवारी (दि.२२) अचानकच एसआयटीचे कार्यालय अज्ञातस्थळी हलविण्यात आले आहे.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गुप्तता पाळण्याच्या हेतूने एसआयटीने चौकशी ठिकाण हलविले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. शनिवारी (दि. २१) खरातची तब्बल सात तास चौकशी करण्यात आली होती. रविवारी (दि. २२) देखील त्याची चौकशी सुरू असतानाच, विशेष तपास पथकाने अचानक चौकशीचे कार्यालय बदलत खरातला अज्ञातस्थळी हलविले. त्यामुळे या प्रकरणी प्रचंड गोपनीयता आणि खबरदारी घेतल्याचे दिसत आहे.

गेल्या तीन दिवसांपासून गुन्हे शाखा कार्यालय आणि पोलिस क्लब येथे त्याची चौकशी सुरू होती. त्यानंतर खरातच्या चौकशीचे ठिकाण बदलण्यात आले असून, ते नेमके कुठे हलविण्यात आले याबाबत प्रचंड गोपनीयता पाळली जात आहे. दरम्यान, राज्य सरकारकडूनच गोपनीयता पाळण्याबाबतचे आदेश प्राप्त झाल्यामुळे चौकशी कार्यालयच दुसरीकडे हलविल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

ईशान्येश्वर मंदिरातील पुजाऱ्याला उचलले एसआयटीच्या पथकाने अशोक खरातच्या सिन्नर येथील 'ईशान्येश्वर' मंदिरातील पुजारी, वॉचमन बालाजी, कर्मचारी प्रमोद यांच्यासह काही कर्मचाऱ्यांना ताब्यात घेत चौकशीसाठी नाशिकला आणल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या चौकशीत मंदिर आणि खरातच्या फार्म हाउसवर नेमक्या कोणत्या प्रकारच्या हालचाली सुरू होत्या? याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

तसेच खरात याच्या कुटुंबीयांचीही चौकशी केली जात असून, लवकरच त्यांनाही ताब्यात घेतले जाण्याची शक्यता आहे. एसआयटीचे दप्तर अहिल्यानगरला? राज्य सरकारकडून १७ ते १८ पोलिस अधिकाऱ्यांची एसआयटी स्थापन करण्यात आली असून, त्यात नाशिक शहर, ग्रामीण आणि अहिल्यानगरमधील पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. खरातवर शिर्डी, वावी येथे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे एसआयटीने चौकशी कार्यालय अहिल्यानगर येथे तर हलविले नाही ना? असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.

नराधम खरातचा गर्भवतीवरही अत्याचार

एका फिर्यादीत मांडलेली आपबिती धक्कादायक आहे. पीडिता पतीसोबत खरातकडे गेली होती. तिच्या पतीला, तू तुझ्या पत्नीला ऑफिसमध्ये लगेच बोलावून घे, कारण सातव्या महिन्यात वाईट व दुष्ट शक्तीपासून गरोदर स्त्रीला खूप सांभाळावे लागते. मी एक विधी करेन, ज्यामुळे तुझ्या पत्नीवर दुष्ट शक्तीचा परिणाम होणार नाही आणि तुझ्या बायकोची डिलिव्हरी सुरळीत होईल. त्या विधीमध्ये तुझ्या बायकोला मुलगाच होण्याकरिता मी विधी करेन. अशी बतावणी दिली. त्यानुसार, फिर्यादी पती त्याच्या पत्नीला खरातकडे घेऊन गेला. खरातने प्रारंभी दोघांनाही केबिनमध्ये बोलावले.

त्यानंतर पतीला, मुलासाठी एक विधी करतो म्हणून बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर खरातने गर्भवतीला तुला मुलगा हवा की, मुलगी अशी विचारणा केली. त्यावर गर्भवतीने काहीही चालेल, केवळ सर्व सुरळीत व्हावे असे सांगितले. पुढे खरातने गर्भवतीला डोळे बंद करण्यास सांगितले. त्यानंतर खरातने अचानक पीडितेला मिठी मारत, बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच याबाबत कोणाकडे वाच्यता केल्यास, तुझ्यासह कुटुंबीयांना जिवे ठार मारणार असल्याची धमकी दिली. तर दुसऱ्या पीडितेसोबत धार्मिक विधीच्या नावे शारीरिक संबंध ठेवून गर्भवती केले. तसेच औषधी गोळ्या देऊन तिचा गर्भपात केला. यावेळी पीडितेने पुन्हा धार्मिक विधी करण्यास नकार दिल्यानंतर, त्याच्या मुलांचे बरेवाईट होईल, असा दमही दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

खरात आणि नीरज जाधव यांच्यात खडाजंगी

या प्रकरणात खरातचा निकटवर्तीय नीरज जाधवचे नाव समोर आल्यानंतर एसआयटीने त्यालादेखील चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यानंतर या दोघांचीही समोरासमोर चौकशी करण्यात आली असता, दोघांमध्ये पोलिसांसमोरच जोरदार शाब्दिक खडाजंगी झाल्याचे समजते. नीरज जाधवच्या कॉल डिटेल रेकॉर्ड तपासात ३० ते ४० महिलांचे फोन नंबर आढळल्याचे बोलले जात आहे. जाधव हा खरातच्या फोकस प्रॉपर्टी येथील ऑफिसबॉय असताना तो सल्ला घेण्यासाठी येणाऱ्या महिलांच्या संपर्कात आला होता.

गुन्हे शाखेने घेतला खरातचा ताबा

नराधम अशोक खरातला १८ मार्च रोजी गुन्हे शाखेने ताब्यात घेतले होते. आतापर्यंत खरातवर तीन बलात्कारांचे गुन्हे दाखल झाले असून, रविवारी स्थानिक गुन्हे शाखेने त्याचा दुसऱ्या बलात्काराच्या गुन्ह्यात ताबा घेतला. सध्या दुसऱ्या गुन्ह्याबाबत गुन्हे शाखेकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे. याशिवाय एसआयटीकडूनदेखील सखोल तपास सुरू असून, आणखी गुन्हे दाखल होण्याचा अंदाज आहे.

खरातही म्हणाला, 'कायद्याचा बालेकिल्ला'

'नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला' या नाशिक पोलिसांच्या विशेष मोहिमेत अशोक खरातलादेखील सहभागी करून घेण्यात आले. त्याला गुन्हे शाखा कार्यालयात आणून या मोहिमेंतर्गत पाहुणचार देण्यात आला. त्यानंतर त्याने बाहेर पडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असे म्हटले. एरवी दैवी शक्तीचा दावा करणारा खरात यावेळी मात्र 'ताकद राहिली नाही', असे पुटपुटताना दिसला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT