Ashok Kharat Case
नाशिक : भोंदू बाबा अशोक खरातची पोलिस कोठडी आणखी तीन दिवस म्हणजे १ एप्रिल पर्यंत वाढवली आहे. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याच्याविरोधात दाखल गुन्ह्यांची संख्या वाढत असून, तपासाला अधिक गती मिळाली आहे. त्यामुळे एसआयटीकडून पुन्हा खरातला पोलिस कोठडीची मागणी केली होती.
भोंदूगिरी, फसवणूक आणि महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमध्ये अटक करण्यात आलेल्या अशोक खरातची पोलिस कोठडी आज संपत होती. आज त्याला न्यायालयात हजर केले होते. यावेळी सरकारी वकिलांनी, आरोपी मास्टर माईंड आहे. तपासात सहकार्य करत नाही. जंगम मालमत्ता आहे, त्याचा तपास करायचा आहे. पीडितांना पाणी द्यायचा त्यात तो काय वापरायचा हे सांगत नसून गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याचे न्यायालयाला सांगितले.
पीडित महिला समोर येत असल्याने तपासाची व्याप्ती वाढली आहे. डिजिटल माहिती घ्यायची आहे. मोबाईल डेटा रिकव्हर करायचा आहे. आरोपीने अनेक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. तपासासाठी आणखी ३ दिवसांची पोलिस कस्टडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकीलांनी केली. यावर न्यायमूर्ती एम.व्ही.भराडे यांनी खरातला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आता १ एप्रिलला त्याला न्यायालयात हजर करावे लागणार आहे.
सरकारी वकीलांनी न्यायालयाला सांगितले की, आरोपीचा मोबाईल जप्त केला आहे, त्यातील जो डाटा प्राप्त झाला आहे, त्याची चौकशी करायची आहे. जो मुद्देमाल जप्त केला त्यानुसार वेगवेगळी नावे दुसऱ्याच नावाने सेव्ह केली आहेत. राजकीय लोकांची नावे दुसऱ्या नावांनी सेव्ह केल्याचा संशय असल्याचे सांगितले.
पीडित महिलेच्या वकीलांनी युक्तीवाद करताना सांगितले की, आरोपी सहकार्य करत नाही हे योग्य नाही. त्यामुळे तपासाला विलंब होत आहे. ग्राउंड पातळीवरील तपास पूर्ण झालेला नाही, त्याचे कारण आरोपी आहे. तो सहकार्य करत नाही. पीडित महिला सुरुवातीपासून सांगत आहे की. त्याने शोषण केले, धमक्या दिल्या. या प्रकरणाचा तपास करताना समजात चांगला संदेश जायला हवा. दररोज तपासात नवनवीन माहिती समोर येते आहे. धक्कादायक बाबी पोलीस तपासात समोर येत आहेत. सखोल तपास योग्य दिशेने व्हावा, अशी पीडित महिलांची अपेक्षा असल्याचे वकीलांनी सांगितले.
खरातविरोधात आतापर्यंत एकूण १० गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये ८ गुन्हे महिलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित असून, २ गुन्हे फसवणुकीचे आहेत. दरम्यान, या सर्व प्रकरणांचा तपास विशेष तपास पथक करत आहे. विविध तक्रारी, पुरावे आणि पीडितांचे जबाब यावरून तपास पुढे सरकत आहे.