नाशिक : अशोक खरात प्रकरणातील पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्या व्यक्तींविरोधात नाशिक सायबर पोलिसांनी कारवाई करीत गुन्हा दाखल केला. या कारवाईमुळे सोशल मीडिया वापरकर्त्यांमध्ये खळबळ उडाली असून, पोलिसांनी कडक इशाराही दिला आहे.
सरकारवाडा पोलिस ठाण्यात भोंदू अशोक खरातविरोधात गंभीर गुन्हे दाखल असून, या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक करीत आहे. तपासादरम्यान पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ, छायाचित्रे तसेच संवेदनशील माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे समोर आले. याची गंभीर दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सायबर पेट्रोलिंग वाढवण्यात आले. सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात फेसबुक, इन्स्टाग्राम आणि एक्स या प्लॅटफॉर्मवर ६५ सोशल मीडिया वापरकर्त्यांनी पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ, इमेजेस तसेच एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने मॉर्फिंग करीत प्रसारित केल्याचे आढळले. या प्रकारामुळे पीडित महिलांची गोपनीयता भंग होत असल्यामुळे त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
अश्लील सामग्री प्रसारित करू नये
या प्रकरणी संबंधित सोशल मीडिया प्रोफाइलधारकांविरोधात नाशिक सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून संबंधित आरोपींचा शोध घेण्यात येत असून, पुढील कारवाई जलदगतीने करण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी सर्व नागरिक, न्यूज चॅनल्स, यूट्यूब व ऑनलाइन पोर्टल्स तसेच इन्स्टाग्राम हँडल्स चालवणाऱ्या संपादकांना आवाहन केले आहे की, पीडित महिलांची ओळख उघड होईल असे कोणतेही व्हिडिओ किंवा अश्लील सामग्री प्रसारित करू नये, अशी सामग्री तत्काळ डिलीट करावी अन्यथा संबंधितांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करून अटक करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.