Ashok Kharat Nashik Pudhari
नाशिक

Ashok Kharat Nashik SIT Investigation | अशोक खरात प्रकरणाचा तपास आता 'SIT' कडे! आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते करणार छडा

Ashok Kharat Nashik SIT Investigation | 200 कोटींच्या मालमत्तेची कागदपत्रे जप्त

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याच्याकडून झालेल्या लैंगिक शोषण प्रकरणात राज्य सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या एसआयटीच्या प्रमुखपदी आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने खरात याच्या फार्म हाउसवर टाकलेल्या छाप्यात पिस्तूल, काडतुसांसह महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

तर खरात याचा सहायक नीरज जाधव यानेच पीडितांचे व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जाधव यालादेखील ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या प्रकरणात नाशिक शहरातील सरकारवाडा, ग्रामीणमधील वावी तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी पोलिस ठाण्यांत स्वतंत्र तक्रारी दाखल असल्याने तपासात एकसंधता राखण्यासाठी एसआयटीकडे तपास सोपविण्यात आला आहे.

विशेष म्हणजे या प्रकरणात राज्य सरकार आधीपासूनच सतर्क असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन आठवड्यांपूर्वीच या प्रकरणात लक्ष घालून पोलिसांना कडक कारवाईचे निर्देश दिल्याचे समजते. त्यांच्या सूचनांनंतरच राज्याच्या पोलिस महासंचालकांनी संबंधित यंत्रणांना आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

सरकारवाडा पोलिस ठाण्यात ३५ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून अशोक खरातविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी खरात याने स्वतःला मांत्रिक व आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून सादर करत महिलांशी संपर्क साधून त्यांच्या वैयक्तिक समस्यांचे निराकरण करण्याचे आमिष दाखवत याच विश्वासाचा गैरफायदा घेत गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

नाशिक गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने १८ मार्च रोजी पहाटे ३ च्या सुमारास खरात याला अटक केली. त्याच्या ठिकाणी छापा टाकून पेनड्राइव्हसह महत्त्वाचे इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात केले होते. त्यात महिलांचे ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ आढळले आहेत. या व्हिडिओतील व्यक्तींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

कॅप्टनचे नेटवर्क अन् व्हिडिओ तपासणार

एसआयटीकडे तपासाची सूत्रे आल्यानंतर डिजिटल फॉरेन्सिक तपासाचा आधार घेतला जाणार असून, पोलिसांच्या हाती लागलेल्या ५८ व्हिडिओंमधील महिलांची ओळख पटविण्याचे काम केले जाईल.

फोन कॉल्स तपासणे, तांत्रिक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आर्थिक व्यवहार आणि नेटवर्क तपास, संभाव्य सहकारी आरोपींचा शोध घेतला जाणार आहे. याशिवाय कॅप्टन खरात याचे आर्थिक सोर्स तपासून इतकी अमाप माया त्याने कशी जमविली याचे सखोल विश्लेषण केले जाणार आहे.

नीरज जाधवकडून ब्लॅकमेलचा संशय

शिर्डी परिसरात राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणीने एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अश्लील फोटो तयार करून ब्लॅकमेल केल्याप्रकरणी नाशिकमध्ये वास्तव्यास असलेल्या नीरज जाधव याच्याविरुद्ध तक्रार दाखल होती. हाच नीरज जाधव ज्योतिषी अशोक खरात यांच्याकडे ऑफिसबॉय म्हणून कामाला होता.

शिर्डी येथील 'त्या' घटनेप्रकरणी तक्रारदार तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे तीन वर्षांपूर्वी नाशिक येथे 'ओकस प्रॉपर्टीज' येथील इमारतीत भेट देत असताना तेथे खरात याच्या कार्यालयात नीरज जाधवशी तिची ओळख झाली होती. जाधव हा पीडित महिलेला बनावट अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होता, नंतर हाच जाधव खरात यालाही ब्लॅकमेल करीत होता, असा संशय पोलिसांना आहे.

आलिशान बंगले अन् नाशिकलगत ३० एकर शेती

गेल्या काही वर्षांत अशोक खरात याने कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमा केल्याची चर्चा आहे. नाशिक मीरगावसह नाशिक शहरात त्याचा आलिशान बंगला आणि कार्यालय असून, पाथर्डी परिसरात सुमारे ३० एकर जमीन असल्याचे समोर आले आहे.

याशिवाय सिन्नर, ओझर विमानतळ परिसर तसेच शिर्डी येथेही त्याची मोठ्या प्रमाणात जमीन असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे श्रद्धेच्या बाजारातून खरात याने मोठी माया जमा केल्याचे समोर येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT