Ashok Kharat Case Pudhari
नाशिक

Ashok Kharat Case | भोंदू खरातला १८ पर्यंत पोलीस कोठडी

'कल्पना कुठे आहे, तिच्याशी संपर्कही नाही' ; खरातच्या सासूची माध्यमांशी संवाद

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : भोंदू अशोक खरात याला पुन्हा पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, त्याचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. नाशिक सत्र न्यायालयाने त्याला १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. चौथ्या गुन्ह्यातील सुनावणीदरम्यान त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मंगळवारी (दि. ७) न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत असल्याने तपास यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.

खरातची सासू पार्वती शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली. त्या म्हणाल्या, मी महिनाभरापासून येथे आहे, पण नेमकी काय चौकशी सुरू आहे याची माहिती नाही. कल्पना कुठे आहे, तिच्याशी संपर्कही झालेला नाही. तसेच त्यांनी खरातच्या कारवायांबद्दल अज्ञान व्यक्त करत, तो ऑफिसमध्ये काय करायचा, याची मला कल्पना नव्हती, असे सांगितले. शिक्षा व्हावी का, या प्रश्नावर त्यांनी संभ्रम व्यक्त करत त्याला आता कोण सोडवणार? अशी प्रतिक्रिया दिली. दरम्यान, या प्रकरणात पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता असून, तपास यंत्रणा अधिक पुरावे गोळा करण्यावर भर देत आहे.

न्यायालयातील घडामोडी आणि वकिलांचे युक्तिवाद

सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी गंभीर आरोप केले. आरोपी महिलांना पाणी, पेढ्यातून गुंगीचे औषध देत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. तो स्वतःला देवाचा अवतार सांगून महिलांना फसवत होता. त्याने नेमके कोणते औषध वापरले, याचा तपास करणे आवश्यक आहे. त्यामुळे ५ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

यावर बचाव पक्षाच्या वकिलांनी आक्षेप घेत याच मुद्द्यांवर यापूर्वीही कोठडी मागण्यात आली होती. संबंधित तपास एसआयटीकडे असून, पुरावे गोळा झाले आहेत. त्यामुळे पुन्हा कोठडी देण्याची गरज नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला. सरकारी वकिलांनी प्रत्युत्तर देताना, आरोपीची पद्धत सारखी असली तरी पीडित महिला वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे सखोल तपासासाठी कोठडी आवश्यक आहे, असे सांगितले. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपीला १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकारी वकील अॅड. शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद करत आरोपीच्या गुन्ह्याचे गांभीर्य अधोरेखित केले.

खरात स्वतःला दैवी अवतार असल्याचे सांगत महिलांना जाळ्यात ओढत होता. समस्या घेऊन येणाऱ्या महिलांना तो तांब्याच्या भांड्यातील पाणी आणि पेढे देत असे. ज्यात गुंगीचे औषध मिसळल्याचा संशय आहे. त्यानंतर मी देवाचा अवतार आहे. माझ्याशी संबंध ठेवल्यास तू पवित्र होशील असे सांगत तो लैंगिक शोषण करत होता. या प्रकरणात वापरलेले औषध व इतर बाबींच्या तपासासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT