नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दैवी शक्ती, ज्योतिष आणि धार्मिक विधींच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या 'भोंदू' अशोक खरातविरोधात आणखी एक गुन्हा सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला. या प्रकरणात अहिल्यानगर जिल्ह्यातील व्यावसायिक राजेंद्र नानासाहेब भागवत (३९, रा. गाडेनगर, नेवासा फाटा, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची तब्बल २ लाख ६२ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप असून, त्यांच्याकडील सोन्याच्या अंगठ्यांचा अपहार केल्याचा गंभीर गुन्हाही नोंदवण्यात आला.
या प्रकरणी नरबळी व इतर अमानुष, अघोरी प्रथा व जादूटोणानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास सरकारवाडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला. फिर्यादी भागवत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते करत असलेल्या कपड्याच्या व्यवसायात सातत्याने अडचणी येत असल्यामुळे त्यांच्या नातेवाइकांनी त्यांना नाशिक येथील अशोक खरातकडे जाण्याचा सल्ला दिला होता.
त्यानुसार डिसेंबर २०२२ मध्ये ते पत्नी व नातेवाइकांसह कॅनडा कॉर्नर परिसरातील 'ओकर्स लॅण्ड डेव्हलपर्स' या कार्यालयात गेले होते. तेथे खरातने स्वतःला 'भगवान कृष्णाचा अवतार' असल्याचे सांगत, फिर्यादीचा विश्वास संपादन केला. व्यवसायात प्रगती होण्यासाठी मंत्रतंत्राच्या साहाय्याने पुष्कराज आणि हिऱ्याची रत्ने अंगठ्यांमध्ये बसवून देतो, त्यामुळे दैवी शक्ती प्राप्त होऊन व्यवसायात मोठी वाढ होईल, असे आमिष दाखवले होते. त्यासाठी सोन्याच्या अंगठ्या आवश्यक असल्याचे सांगत फिर्यादीकडील दोन अंगठ्या आणि त्यांच्या पत्नीची अंगठी अशा एकूण तीन सोन्याच्या अंगठ्या त्याने घेण्यास सांगितले तमेत्च पुष्कराज रत्नासाठी १ लाख रुपयांची आगाऊ रक्कमही स्वीकारली.
काही दिवसांनी कार्यालयातून फोन करून अंगठ्या तयार झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर फिर्यादीने कार्यालयात जाऊन अंगठ्या घेतल्या. यावेळी उर्वरित १ लाख ६२ हजार रुपये चेकद्वारे देण्याचा प्रयत्न केला असता, संशयिताने रोख रक्कमच देण्याचा आग्रह धरला. त्यानुसार फिर्यादीने स्वतःकडील १ लाख रुपये व मित्राकडून घेतलेले ६२ हजार रुपये असे एकूण १ लाख ६२ हजार रुपये रोख स्वरूपात दिले. सरकारवाडा पोलिस ठाण्यात धाव घेत औपचारिक फिर्याद दाखल केली. डिसेंबर २०२२ ते १९ मार्च २०२६ या कालावधीत आरोपीने फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, आणखी पीडित समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
व्यवसायात कोणतीही सुधारणा नाही
आरोपीने दिलेल्या अंगठ्या परिधान केल्यानंतरही व्यवसायात कोणतीही सुधारणा झाली नाही. उलट १९ मार्च २०२६ रोजी वृत्तपत्रांमधून अशोक खरातविरोधात इतर गुन्हे दाखल झाल्याची माहिती मिळाल्यानंतर फिर्यादीने अंगठ्या आणि रत्नांची तपासणी केली. त्यावेळी त्या अंगठ्यांमध्ये खोटे पुष्कराज व हिऱ्याचे खडे बसवलेले असून, अंगठ्या सोन्याऐवजी पिवळ्या धातूच्या असल्याचे उघड झाले. संबंधित रत्नांची किंमत केवळ सुमारे ५ हजार रुपयांपर्यंत असल्याचेही समोर आले.