Ashok Kharat Pudhari
नाशिक

Ashok Kharat Nashik Case | मोठा खुलासा! भोंदू खरात निघाला जहाजावरील साधा चतुर्थश्रेणी कर्मचारी

Ashok Kharat Nashik Case | एसआयटीकडून भोंदू खरातच्या हातचलाखीचा खेळ उघड

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यभर गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात महिला लैंगिक शोषण प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) चौकशीत सुरुवातीला कोणतीही माहिती न देणारा खरात आता पोपटासारखा बोलू लागल्याचे समोर आले आहे. चौकशीदरम्यान त्याने 'मी कोणतेही दैवी विधी केले नाहीत, केवळ हातचलाखी आणि माइंड गेमच्या जोरावर महिलांना जाळ्यात ओढले,' अशी कबुली दिल्याची माहिती विशेष तपास पथक (एसआयटी) कडून देण्यात आली आहे.

'झुकती है दुनिया, झुकानेवाला चाहिए,' असे म्हणत महिलांना मानसिकदृष्ट्या जखडून ठेवण्याची पद्धत त्याने वापरल्याचेही तपासात उघड झाले आहे. श्रद्धा, भीती आणि बदनामीचा धाक दाखवत तो महिलांचे लैंगिक शोषण करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सुरुवातीला गाजवलेले दैवीशक्तीचे दावे फोल ठरले असून, खरातचा संपूर्ण खेळ हा केवळ हातचलाखीचा असल्याचे स्पष्ट होत आहे.

हातचलाखीमध्ये नवरा बायकोंना वेगवेगळे तो प्रयोग करून दाखवत असे यामध्ये प्रामुख्याने एका हाताचा वास येणे व दुसऱ्या हाताचा न येणे याचा संदर्भ तू थेट तुमच्या मधील असलेल्या दोषाशी जोडत असे. माझ्यात दैवीशक्ती आहे ती माझ्या संचारल्यानंतर संपूर्ण शरीरात निर्माण होते. त्यामुळे दोष तुझ्यामधील काढायचा असेल तर या शारीरिक संबंधांशिवाय पर्याय नाही असे सांगून तो महिलांचे लैंगिक शोषण करीत होता. दरम्यान, या प्रकरणात दाखल गुन्ह्यांची संख्या वाढत असून, सध्या ८ लैंगिक शोषणाचे गुन्हे आणि इतर आर्थिक फसवणूक व मालमत्तेशी संबंधित गुन्हे त्याच्यावर आहेत.

एसआयटीचा तपास अंतिम टप्प्यात पोहोचत असल्याची माहिती मिळत आहे. याचबरोबर आता सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) देखील खरातच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू झाली आहे. तपासादरम्यान नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील मालमत्ता तसेच विविध बँकांमधील १३२ खात्यांमधून कोट्यवधी रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे.

जगदंबा पतसंस्थेत ३२ आणि समता पतसंस्थेत १०० खाती आढळून आली असून, त्यात वारसदार म्हणून खरातचे नाव असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, खरातची मुलगी तृप्ताबाला हिचीही चौकशी होण्याची शक्यता असून, तिच्या नावावर मोठ्या प्रमाणात मालमत्ता खरेदी झाल्याचे निष्पन्न झाले आहे. खरातची पोलिस कोठडी संपत आल्याने त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असून, पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कॅप्टन नव्हे, चतुर्थश्रेणी कर्मचारी !

खरात स्वतः सेवानिवृत्त नेव्ही अधिकारी आहे, असे इतरांना भासवत होता. नेव्हीमध्ये कॅप्टन या पदावर कार्यरत होतो, त्यानंतर अंकशास्त्राचा अभ्यास व त्यातून मार्गदर्शन सुरू केले आहे, असे सांगायचा मात्र पश्चिम बंगालमधील एका खासगी जहाजावर तो चतुर्थश्रेणीतील कर्मचारी म्हणून काही काळ काम केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT