Ashok Kharat Case | शालार्थ आयडी घोटाळ्यातही भोंदू अशोक खरातचा हात? 
नाशिक

Ashok Kharat Case | शालार्थ आयडी घोटाळ्यातही भोंदू अशोक खरातचा हात?

खरातने भावासाठी बनावट शालार्थ आयडी तयार केल्याचे उघड

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : बहुचर्चित कोट्यवधीच्या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याला आता नवे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून, भोंदू अशोक खरात याचे नाव या प्रकरणात समोर येत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिक्षण क्षेत्रातील या गंभीर घोटाळ्याचा तपास सुरू असताना, 2022 साली खरातने स्वतःच्या भावासाठी बनावट शालार्थ आयडी तयार करून घेतल्याची माहिती समोर आल्याचे समजते.

प्राप्त माहितीनुसार, डी. ई. खरात याच्यासाठी शालार्थ आयडी बनवून घेण्यासाठी प्रभावाचा वापर करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शालार्थ प्रणाली ही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी वापरली जाणारी अत्यंत महत्त्वाची शासकीय प्रणाली आहे. मात्र, त्यामध्ये बनावट नोंदी निर्माण करून शासनाची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे. या माध्यमातून अपात्र व्यक्तींना वेतन मिळवून देणे तसेच निधीचा अपहार करण्याचे प्रकार घडल्याचे तपासात समोर येत आहे.

दरम्यान, या घोटाळ्यातील अनेक धागेदोरे आधीच उघड झाले असून, शिक्षण विभागातील काही वरिष्ठ अधिकारी तसेच संबंधित संस्थाचालक यांना अटक करण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हे आरोपी कारागृहात असून, तपास यंत्रणा या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत. आर्थिक व्यवहार, कागदपत्रांची पडताळणी आणि संबंधितांची चौकशी, यावर विशेष भर दिला जात आहे. खरातच्या इतर आर्थिक व फसवणुकीच्या प्रकरणांबरोबरच आता शालार्थ घोटाळ्यातील भूमिकेचाही तपास होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणात आणखी प्रभावशाली व्यक्तींची नावे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोडवर्डमधील मोबाईल क्रमांकांचे गूढ

खरातच्या मोबाईलमधील दोन हजाराहून अधिक संपर्क क्रमांक कोडवर्डमध्ये सेव्ह केल्याची बाब उघड झाल्याने विशेष तपास पथकासमोर (एसआयटी) मोठे आव्हान उभे राहिले आहे. प्रत्येक नंबरच्या मागे नेमकी कोणती व्यक्ती आहे, याचा शोध घेण्यासाठी तांत्रिक विश्लेषणावर भर दिला जात आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, खरातने आपल्या मोबाईलमध्ये प्रभावशाली व्यक्तींचे संपर्क थेट नावाने सेव्ह न करता वेगवेगळ्या कोडवर्डच्या स्वरूपात जतन केले होते. त्यामुळे त्या संपर्कांची ओळख पटवणे अवघड झाले असून या प्रक्रियेस वेळ लागत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT